लोणावळा : लोणावळा शहरामध्ये पाच व सहा जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः शहराला पुराचा विळखा बसला असून शहरांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. लोणावळा शहरातील जवळपास 503 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे लोणावळा शहराचे जनजीवन विस्कळीत झाली आहे. मंगळवारी सात जुलै रोजी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी अनेक भागांमध्ये पाण्याचा विळखा कायम आहे. पावसाचे पाणी कमी होत नसल्यामुळे नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत. त्यातच लोणावळा शहराचा वीजपुरवठा खंडित असल्यामुळे नागरिकांना अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे.
लोणावळा नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक या ठिकाणी 447 नागरिक महिला मंडळ हॉल 30 प्रियदर्शनी संकुल 23 व लोणावळा नगरपरिषद भांगरवाडी शाळा या ठिकाणी तीन नागरिकांना ठेवण्यात आले आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील सर्व शाळांना प्रशासनाकडून 8 व 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
.














