राहुल शेट्टी खून प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल; दोन जणांना अटक

लोणावळा : लोणावळा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल उमेशभाई शेट्टी (वय 38) यांच्या खूनप्रकरणी लोणावळा शहरातील पाच जणांसह एका अज्ञातच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 120(ब), 34, आर्म अँक्ट 3(25), 4(25), 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी सौम्या राहुल शेट्टी (वय-36, रा. घर नं-61 एफ वॉर्ड, जयचंद चौक, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून मोबिन इनामदार (वय 35, रा.भैरवनाथ नगर कुसगाव लोणावळा), कादर इनामदार (वय 33, रा. भांगरवाडी लोणावळा), सुरज अगरवाल (वय 42, रा. वर्धमान सोसायटी लोणावळा), दिपाली भिल्लारे (वय 39, रा. भांगरवाडी लोणावळा), सादीक बंगाली (वय 44, रा. गावठाण लोणावळा) व एक अज्ञात आरोपी नाव पत्ता माहीती नाही यांच्या विरोधात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सुरज अगरवाल व दिपाली भिल्लारे यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल उमेश शेट्टी हे सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरा जवळील येवले चहाचे दुकाना शेजारील कट्टयावर बसलेले असताना, पुर्ववैमनस्यांतून राहूल यांच्या विरोधकांनी त्यांना जिवे ठार मारण्याचा कट रचुन संगनमत करुन अज्ञात हल्लेखोरांना सुपारी देत त्यांचा खून केला. त्यांच्या डोक्यात व तोंडावर बंदुकीतुन गोळ्या झाडुन तसेच धारधार शस्त्राने वार करुन त्यांना जिवे ठार मारले आहे.
या घटनेची माहिती समजताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्यासह लोणावळा उपविभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत सहा पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना केली आहे. तर अटक आरोपींकडून कसून तपास सुरू आहे. सुरज अगरवाल याला चार दिवसांपुर्वी पोलिसांनी दोन गावठी पिस्टल, कोयता व चाकूसह अटक केली होती तर दुसर्याच दिवशी त्याचा जामिन झाला होता.