Breaking news

महत्वाची बातमी l पावसाळी पर्यटनावर प्रशासनाचा लगाम; लोणावळा ग्रामीण परिसरात 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

लोणावळा : पावसाळा सुरू होताच पर्यटकांचा ओघ वाढला असून, लोणावळा व परिसरातील पर्यटनस्थळांवर वाढलेल्या गर्दीमुळे अपघात, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दि. 7 जून 2025 पासून ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

या आदेशात पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण या पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

प्रशासनाने घातलेली प्रमुख बंधने पुढीलप्रमाणे:

  • धबधब्यावर किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरून पोहण्यास मनाई
  • धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा चित्रीकरण करू नये
  • नैसर्गिक धबधब्यांजवळ मद्यपान, अनधिकृत मद्यविक्री किंवा मद्य सेवनास बंदी
  • सार्वजनिक ठिकाणी कचरा, प्लास्टिक वस्तू किंवा बाटल्या टाकणे निषिद्ध
  • सार्वजनिक ठिकाणी महिलांशी असभ्य वर्तन किंवा छेडछाड केल्यास कठोर कारवाई
  • मोठ्या आवाजात गाणी, डीजे वाजविणे आणि ध्वनी प्रदूषणास मनाई
  • धबधबे, धरण परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी (आवश्यक सेवेतील वाहन वगळून)
  • रस्त्यावर वाहने अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने पार्क करणे किंवा बेदरकार वाहन चालवणे निषिद्ध

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या शिफारसीनंतर हे आदेश लागू करण्यात आले असून, त्याचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अंतर्गत शिक्षेस पात्र ठरणार आहे.

प्रशासनाच्या या निर्णयामुळे पर्यटकांचे प्राण वाचवणे, पर्यावरण रक्षण, तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

इतर बातम्या