Breaking news

मावळ तालुक्यात पावसाअभावी तीव्र कोरडा दुष्काळ जाहीर करा! महाविकास आघाडीतर्फे वडगाव येथे तहसीलदारांना निवेदन; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचीही मागणी

लोणावळा : ह्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्रासह मावळ तालुक्यात तीव्र कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या आकस्मिक अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने कुठलाही विलंब न करता तात्काळ पिकांचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना भरगोस मदत देऊन मावळ तालुक्यात 'कोरडा दुष्काळ' जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी आज मावळ तालुका महाविकास आघाडीच्या वतीने वडगाव मावळ येथे जोरदार निदर्शने करत तहसीलदार विक्रम देशमुख यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

तसेच, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वोट चोरी करून सत्ताधाऱ्यांना वारंवार जिंकवून देणाऱ्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ व त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यासाठीही यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान व प्रमुख मागण्या

यावर्षीच्या पावसाळ्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे भाताचे आगार असलेल्या मावळ तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके पाण्याविना करपून गेल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने पावले उचलून सरसकट पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आक्रमक भूमिका महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.

तहसीलदारांचे सकारात्मक आश्वासन

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाची दखल घेत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी उपस्थितांना आश्वासन दिले की, महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे करण्यात येतील आणि शासनाकडे अहवाल पाठवून योग्य ती त्वरित कारवाई करण्यात येईल.

या आंदोलनात व निवेदन सादर करताना महाविकास आघाडीचे सर्व आजी-माजी प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडीच्या सदस्या आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शिवसेना पुणे जिल्हा संघटक, बाळासाहेब फाटक, महिला आघाडी सह संपर्क संघटिका शादान चौधरी, उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर, जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रेय पडवळ, काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, तालुका समन्वयक शांताराम भोते यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने शासनाला इशारा देण्यात आला की, जर लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाही, तर महाविकास आघाडीच्या वतीने अजून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

इतर बातम्या