Breaking news

Lonavala News : लोणावळ्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर

लोणावळा : भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी आज लोणावळा येथील महापुरुष समूह शिल्प परिसरात मोठ्या प्रमाणात जनसागर लोटला होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने 133 व्या जयंती महोत्सवाचे लोणावळा शहरामध्ये आयोजन करण्यात आले आहे.

      लोणावळा नगर परिषदेच्या आवारामध्ये असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत हजारो नागरिकांनी अभिवादन केले. लोणावळा नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांच्या वतीने सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, लोणावळा शहराध्यक्ष कमलशील महस्के, जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अनिल वाघमारे व भीमसैनिकांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

        लोणावळा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मावळ तालुका अध्यक्ष आशिष ठोंबरे, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक व शिवसैनिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने शहराध्यक्ष नासिर शेख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे, महिला अध्यक्ष श्वेता वर्तक, विनोद होगले व राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिवादन केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्येष्ठ नेते श्रीधर पुजारी, शहर अध्यक्ष अरुण लाड, महिला अध्यक्ष विजया वाळंज व भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यावतीने शहराध्यक्ष विलास बडेकर, नारायण भाऊ पाळेकर, जीवन गायकवाड, महिला अध्यक्ष उमा मेहता, आरोही तळेगावकर व पदाधिकारी यांनी अभिवादन केले. काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निखिल कवीश्वर, शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, महिला अध्यक्ष पुष्पा भोकसे व पदाधिकारी यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर अध्यक्ष भारत चिकणे व मनसैनिकांनी अभिवादन केले. शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने शहर प्रमुख संजय भोईर व पदाधिकारी यांनी अभिवादन केले. यासह जेष्ठ नागरिक संघ, भारतीय बौद्ध महासभा, शंकरबन प्रतिष्ठान, संत रोहिदास मित्र मंडळ, वाल्मिकी समाज यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

      लोणावळा शहर व ग्रामीण भागातून विविध गावातून आलेल्या मिरवणुकांचे लोणावळा शहरामध्ये स्वागत करण्यात आले. वेगवेगळ्या गावातून आलेल्या भीमसैनिकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत जल्लोष केला. आलेल्या भीमसैनिकांना वाल्मिकी समाज यांच्या वतीने रसना वाटप, शंकरबन प्रतिष्ठानच्या वतीने पाणी वाटप, ख्वाजा गरीब नवाज संस्था यांच्या वतीने सरबत वाटप, द बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया , भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आलेल्या भीम सैनिकांचे स्वागत तर फुले शाहू आंबेडकर विचार समिती यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व महापुरुष समूह शिल्प परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

इतर बातम्या