Breaking news

लोणावळ्यात चिमुकल्या गायकांनी चेतवली देशप्रेमाची ज्योत; 'माँ तुझे सलाम' उपक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

लोणावळा : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा आणि ‘सूर साधना गायन क्लासेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माँ तुझे सलाम’ या देशभक्तीपर गीतांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ५ ते १२ वर्षे वयोगटातील बालगोपालांनी आपल्या सुरेल गायनातून उपस्थितांची मन जिंकत देशप्रेमाची ज्योत चेतवली. लोणावळ्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

      लहान मुलांच्या मनात देशभक्तीची भावना रुजावी आणि त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी ‘चिमुकल्या जवानांसाठी’ हा उपक्रम राबवला जातो. सूर साधनाचे संचालक प्रदीप वाडेकर यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने यंदाही हा सोहळा थाटात पार पडला.

देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावले

कार्यक्रमात अनय मळेकर (‘नन्हा मुन्ना राही हूँ’), कैवल्य सातपुते व समर्थ दंडगी (‘जय जय महाराष्ट्र माझा’), कार्तिक दंडगी (‘सारे जहाँ से अच्छा’), अंशिका वर्तक (‘इंडिया वाले’), मनाली वर्तक व नेहांत निकम (‘ऐ वतन ऐ वतन’), वेदिका दंडगी (‘मिट्टी में मिल जावा’), मिष्टु निकम व श्लोक चव्हाण (‘ट्राय कलर ऑफ इंडिया’), आराध्य पाटील (‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’), निर्वी बोराडे (‘हम होंगे कामयाब’) आणि पारस बोराडे याने ‘ओ देश मेरे’ ही गीते अतिशय सुंदर रीतीने सादर केली. याशिवाय विराज आंबेकर, आयुषी पाटील, वेदांत गोरेगांवकर, शिवम कदम, विहान भोकसे, अनिका कारके, स्मित राणे, देवांश लाड, वंश लाड आणि श्रद्धा डांगे या बालकलाकारांनीही आपल्या गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. चिमुकल्यांच्या सुरांमुळे संपूर्ण गृहात ‘भारत माता की जय’चा उत्साह ओसंडून वाहत होता.

      या सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेवक धीरूभाई कल्याणजी, अरविंदभाई मेहता, लायन्स क्लब सुप्रिमोच्या अध्यक्षा रंजना पुट्टोल, सुनील लोहर, पुष्पा भोकसे, अमीन वाडीवाल, विश्वनाथ पुट्टोल, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा मृदुला पाटील, रवींद्र कुलकर्णी, प्रतीक्षा महाडिक, शारदा अगरवाल, मंगला राणे आणि दिलीप पवार यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी सर्व बालकलाकारांना लायन्स क्लब ऑफ सुप्रिमोतर्फे आकर्षक भेटवस्तू तर भाजपा नाणे मंडळ लोणावळ्याचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या वतीने प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. बालगोपाळांसाठी खाऊ व नाश्त्याची व्यवस्था ज्येष्ठ नागरिक संघातर्फे करण्यात आली होती.

       कार्यक्रमाचे संयोजन सुनील पानंगावकर यांनी केले, तर सूर साधनाचे संचालक प्रदीप वाडेकर यांनी आपल्या प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रमात विशेष प्राण फुंकले. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि चिमुकल्यांचे सुरेल सादरीकरण यामुळे यंदाचा ‘माँ तुझे सलाम’ कार्यक्रम लोणावळावासीयांसाठी एक अविस्मरणीय आठवण ठरला आहे.

इतर बातम्या