मोठी बातमी l मावळ तालुक्यातील तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे निलंबन

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील (एन.के.पाटील) यांचे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उप सचिव अनिरुध्द जेवळीकर यांनी हे आदेश काढले आहेत.
1 जून रोजी त्यांनी धोकादायक पद्धतीने चारचाकी वाहन चालवत तळेगाव येथे दोन वाहनांना धडक दिली होती. तपासात त्यांनी मद्याचे सेवन केले असल्याचे आढळून आले होते. तसे रिपोर्ट न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेतून प्राप्त झाले होते. एन.के. पाटील यांचे महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत असलेले वागणे हे अशोभनीय व असभ्य पणाचे असल्याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी नगर परिषद प्रशासन विभागाला कळविले होते. त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हा व महिला कर्मचारी यांच्यासोबत असलेल्या अशोभनीय वर्तणुकीचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला होता. त्यांच्या या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.