Breaking news

लायन्स पॉईंट येथील ग्लास स्कायवॉकसाठी लोणावळ्यातून रस्ता बनविताना शेकडो वर्षांची झाडे तोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध

लोणावळा : लोणावळा शहरातून लायन्स पॉईंट कडे जाणाऱ्या स्काय वॉकच्या रस्त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, रायवूड ते ट्रायोज मॉल दरम्यान 22 झाडे पुनर्रोपण करण्याची व 19 झाडे तोडण्याची सूचना लोणावळा नगर परिषदेने प्रसिद्ध केली आहे. या सूचनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष नासिर शेख यांनी हरकत नोंदविली आहे. आमचा विकासाला विरोध नाही मात्र पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारा विकास मान्य नाही असे त्यांनी या हरकतीमध्ये म्हटले आहे.

       लोणावळा नगरपरिषदेने दि. 1 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या नोटिशीनुसार या मार्गावरील एकूण 41 झाडांपैकी 22 झाडांचे पुनर्रोपण, तर 19 झाडे तोडण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. स्कायवॉक प्रकल्पाच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात ही झाडे अडथळा ठरत असल्याचे कारण देण्यात आले आहे.

शेख यांनी आपल्या हरकतीत विकासाला विरोध नाही, मात्र विकास पर्यावरणपूरक असावा अशी भूमिका मांडली आहे. लोणावळ्यासारख्या पर्यटननगरीसाठी स्कायवॉक प्रकल्प उपयुक्त ठरू शकतो. मात्र विकासाच्या नावाखाली शहराची हिरवाई नष्ट करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

      झाडे तोडणे हा पहिला पर्याय का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी रस्ता रुंदीकरणापूर्वी प्रकल्पाची रचना व रस्त्याची जुळवणी पुन्हा तपासावी, आवश्यक असल्यास रस्त्याची रुंदी, डिव्हायडर, फुटपाथ किंवा प्रकल्पाच्या डिझाइनमध्ये तांत्रिक बदल करून जास्तीत जास्त झाडे वाचविण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी केली आहे. तसेच, सदर प्रकल्प पीएमआरडीए मार्फत प्रस्तावित असल्यास त्याचा मंजूर डीपीआर, रस्ता रुंदीकरणाचा नकाशा, रस्त्याची मार्किंग, आवश्यक रस्त्याची रुंदी आणि संबंधित तांत्रिक मंजुरी नगरपरिषदेस सादर करण्यात आली आहे का, याची माहिती नागरिकांसमोर जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित 41 झाडांपैकी प्रत्येक झाडाची प्रजाती, अंदाजे वय, खोडाचा घेर, सद्यस्थिती तसेच तोडणी किंवा पुनर्रोपणाचे कारण यांची स्वतंत्र माहिती असलेला वृक्ष सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही शेख यांनी केली आहे.

    19 झाडे तोडणे अपरिहार्य असल्याचे कोणत्या तांत्रिक अहवालाच्या आधारे निश्चित करण्यात आले, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित वृक्ष समिती यांचा पाहणी अहवाल आणि पीएमआरडीए चा तांत्रिक अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 22 झाडांच्या पुनर्रोपणाबाबतही पारदर्शकता आवश्यक असल्याचे सांगत, ही झाडे नेमकी कुठे पुनर्रोपित केली जाणार, जागा निश्चित आहे का, कोणत्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्रोपण होणार आणि पुनर्रोपित झाडांच्या जिवंत राहण्याची जबाबदारी कोणाची असेल, याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पर्यायी तांत्रिक उपायांचा स्वतंत्र अभ्यास होईपर्यंत आणि संबंधित कागदपत्रे, मंजूर आराखडा व तांत्रिक अहवाल नागरिकांसमोर येईपर्यंत 19 झाडे तोडण्यास अंतिम परवानगी देऊ नये तसेच प्रत्यक्ष वृक्षतोडीची कार्यवाही करू नये, अशी मागणी नासिर शेख यांनी केली आहे.

       एका बाजूला पर्यटनविकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभारायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच प्रकल्पासाठी लोणावळ्याची हिरवाई नष्ट करायची, हे दीर्घकालीन दृष्टीने योग्य नाही. विकास हवा, पण निसर्गाच्या किंमतीवर नाही. लोणावळ्याचा विकासही झाला पाहिजे आणि लोणावळ्याची हिरवाईही टिकली पाहिजे, अशी भूमिका नासिर शेख यांनी मांडली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते ट्रायोज मॉल या मार्गावरील प्रस्तावित वृक्षतोडीचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवून, पीएमआरडीए चा मंजूर आराखडा व तांत्रिक अहवाल तपासावा, झाडे वाचविण्यासाठी पर्यायी उपायांचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच कायद्यानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी हरकती द्वारे केली आहे.

इतर बातम्या