International Yoga Day l कैवल्यधाम लोणावळा येथे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा; मावळ तालुक्याला योगमय करण्याचा मानस
लोणावळा : जगभरात आरोग्याचा संदेश देणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, लोणावळा येथील जगप्रसिद्ध 'कैवल्यधाम योग संस्था' आणि आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२६ रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 'निरोगी वार्धक्यासाठी योग' (Yoga for Healthy Aging) या अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नगरध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, भाजपा प्रदेश सदस्य आशिष बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते.
कैवल्यधाम संस्थेच्या 'कुडीलाल सेक्सरिया हॉल' येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त योग प्रात्यक्षिक सत्र घेण्यात आले. कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी याचे नेतृत्व केले. योग शिक्षिका देबश्री गांगुली आणि सागर ठाकूर यांनी योग प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. लोणावळा परिसरातील नागरिक तसेच योग महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. कैवल्यधाम संस्थेमधील वेगवेगळ्या हॉलमध्ये प्रात्यक्षिक सत्रे घेण्यात आली. आरोग्य, सुसंवाद आणि आनंदी जीवनशैलीचा अनुभव यावेळी उपस्थितांनी घेतला.
यावेळी बोलताना खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले, योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली मोठी देणगी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आज जगभरात योग दिवस साजरा केला जातो. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे आहे. योगा हा केवळ एक व्यायाम प्रकार नसून तो शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असल्याने प्रत्येकाने आपल्या दैनंदिनी मध्ये त्याचा समावेश करणे गरजेचे आहे. कैवल्यधाम ही जागतिक ख्याती असलेली संस्था असून या ठिकाणी योग संशोधन व अध्ययन करण्याचे काम होते. पारंपरिक योग, संशोधन व प्रशिक्षण दिले जात असल्याने जगभरातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी योगाचे प्रशिक्षण घेत आहे. कैवल्यधाम योग संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी म्हणाले, मावळ तालुक्याला योगमय करण्याचा आमचा मानस आहे. याकरिता आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी कैवल्यधाम मध्ये येऊन योगाचे प्रशिक्षण घ्यावे तसेच वेगवेगळ्या शिबिरांचा लाभ घ्यावा.
१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (IDY) निमित्त कैवल्यधामने गेल्या काही दिवसांपासून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये शैक्षणिक संस्था, संरक्षण आस्थापने, सागरी अकादमी, शाळा आणि विविध सामुदायिक गटांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना, समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत योग पोहोचवणे आणि त्याद्वारे निरोगी वार्धक्याला प्रोत्साहन देणे हे कैवल्यधामचे मुख्य ध्येय आहे. एक संस्था. एक ध्येय. समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत योग पोहोचवणे, या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन कैवल्यधाम संस्था यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन आरोग्य आणि कल्याणाचा एक अविस्मरणीय सोहळा म्हणून साजरा करत असल्याचे सुबोध तिवारी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या सत्राचे सूत्रसंचालन वृषाली गोसावी यांनी केले.






















