Breaking news

Lonavala Police l काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर अशा 105 वाहनांवर लोणावळा पोलिसांची कारवाई

लोणावळा : वाहनांना डार्क काळा काचा, बिना नंबर प्लेटच्या दुचाकी चालवणे, कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर गाड्यांना बसवणे, नो पार्किंग मध्ये वाहने उभे करणे असे प्रकार करणार्‍या तब्बल 105 जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी आज 18 जून रोजी कारवाई करत तब्बल एक लाख तीन हजार रुपयांचा दंड केला आहे. लोणावळा शहर चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

       लोणावळा शहरामध्ये अनेक चार चाकी वाहने ही काळ्या काचा करून चालवली जातात, अनेक तरुण मुले गाड्यांच्या नंबर प्लेट काढून दुचाकी वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले होते, अशा वाहनांवर आज मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. दुचाकीच्या सायलेन्सर मध्ये बदल करत कर्णकर्कश आवाज करणारे व फटाके वाजवणारे सायलेन्सर असणाऱ्या दुचाकी गाड्यांचे सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले आहे. तसेच नो पार्किंग मध्ये रस्त्यावर वाहने उभी करत रहदारीला अडथळा निर्माण करणारी वाहने अशा प्रकारच्या एकूण 105 वाहनांवर आज दिवसभरात ही कारवाई करण्यात आली आहे. लोणावळा शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक चमन शेख, पोलीस हवालदार अनिल शिंदे, पोलीस हवालदार सचिन कडाळे, पोलीस कॉन्स्टेबल फाळके, पोलीस कॉन्स्टेबल शेख, पोलीस कॉन्स्टेबल शितोळे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, होमगार्ड व वॉर्डन यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

     याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, काळ्याकाचा, फॅन्सी नंबर प्लेट, नंबर प्लेट न लावता वाहने चालवणे अशा प्रकारच्या वाहनांवर या पुढील काळात देखील कडक कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक विभागाला दिल्या आहेत. नगरसेवक, आमदार, खासदार असे वेगवेगळे स्टिकर वाहनांवर लावून वाहने चालवणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लोणावळा शहरांमधील वाहतूक येथील अमली पदार्थांचा वापर याच्यावर कारवाई करत शहरातील नागरिकांना व पर्यटकांना शिस्त लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी देखील नियमांचे पालन करत पोलीस प्रशासन व सहकार्य करावे अशीच अपेक्षा सुजाण नागरिक देखील व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या