Breaking news

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा येथे नवोपक्रम, संशोधन आणि विद्यार्थी नेतृत्वाचा संगम

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील संस्थेची नवोपक्रम परिषद (IIC) ला सलग तीन वर्षे त्रितारांकित मानांकन मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘IIC Day’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चा वार्षिक अहवाल सादर करण्याबरोबरच परिषदेच्या विविध उपक्रमांचा आढावा आणि नवीन विद्यार्थी कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

कार्यक्रमास STES चे मुख्य प्रकल्प अधिकारी डॉ. एम. एस. गायकवाड; लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे; SIT चे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री; SKNSITS चे के पी पाटील; SIPS च्या प्राचार्या डॉ. रूकसाना पिंजारी; SIBACA च्या डायरेक्टर सौ. साधना आवटे; IIC अध्यक्ष डॉ. एम. एस. चौधरी, तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, मार्गदर्शक व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी STES चे मुख्य प्रकल्प अधिकारी डॉ. एम. एस. गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना IICच्या उपक्रमांमध्ये केवळ SITपुरता सहभाग न ठेवता संपूर्ण STES लोणावळा कॅम्पसमधील महाविद्यालये, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी एकत्रितपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. संपूर्ण कॅम्पसने नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास IICच्या माध्यमातून अधिक व्यापक आणि प्रभावी परिणाम साधता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वार्षिक अहवालातून NEXUS २०२६, कल्पतरू, प्रोजेक्ट मॉर्फियस, रोबोराष्ट्र, LAM Research Lab Challenge आणि ISRO Robotics Challenge–URSC २०२६ यांसारख्या विविध उपक्रमांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाचा आणि यशाचा आढावा घेण्यात आला. ‘प्रोजेक्ट मॉर्फियस’ या २४ तासांच्या हॅकाथॉनमध्ये २१३ संघांचा सहभाग आणि ११६ संघांची अंतिम फेरीसाठी निवड ही विशेष उल्लेखनीय कामगिरी ठरली.

कार्यक्रमात सॉफ्टवेअर क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देण्यासाठी ‘Software Innovation Council (SIC)’ या संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले. अनंत हेजीब आणि संशोधन व विकास मार्गदर्शक अनिकेत राज यांनी या उपक्रमाची संकल्पना व उद्दिष्टे स्पष्ट केली. हार्डवेअर-सॉफ्टवेअर समन्वय, सॉफ्टवेअर विकास आणि संशोधनाधारित प्रकल्पांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी IICच्या चौथ्या पिढीतील १५ सदस्यीय विद्यार्थी कार्यकारिणीची घोषणा व शपथविधी. सौरभ कदम यांची चेअरपर्सन, मानसी कुरे यांची विद्यार्थी अध्यक्ष, शिवराज पाटील यांची उपाध्यक्ष आणि विशुद्धी वायकोस यांची संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

कार्यकारिणीत प्रेरणा दाबे – जनसंपर्क, विग्नार्थ चिटिकेन – R&D (PCB), मैत्रेयी सुतार – R&D (CAD), शुभंकर शेते – R&D (Embedded), यश रामुलवार – सायबर सुरक्षा, वैदेही ठाकरे – AIML, जिग्नाशा शिंपी – कार्यक्रम व्यवस्थापन, जितेश गावंडे – सहकार्यक्रम व्यवस्थापन, धीरज चव्हाण – तांत्रिक, समृद्धी थोंबरे – DnC, श्रीनिवास चांडेलकर – DnC सहप्रमुख आणि आयुष राज – दस्तऐवजीकरण या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

यावेळी स्टुडंट बोर्ड सदस्य भूमिका गाडे, आर्यन राज आणि आदित्य जंगम यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत आगामी काळात संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक उल्लेखनीय कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. IIC अध्यक्ष डॉ. एम. एस. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली SIT लोणावळ्यातील नवोपक्रमाची परंपरा अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

इतर बातम्या