Breaking news

लोणावळा नगरपरिषद प्रभाग क्रमांक १३ मधील महिलांसाठी खास 'पैठणी लकी ड्रॉ स्पर्धा'; लोणावळ्यात नवरात्रोत्सवात रंगणार गरबा-दांडियाचा जल्लोष

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेचे सभागृह नेता तथा आरोग्य व वैद्यक समितीचे सभापती श्री. धनंजय वसंतराव काळोखे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १३ मधील सर्व नवरात्रोत्सव मंडळांमधील महिला भगिनींसाठी एका विशेष 'पैठणी लकी ड्रॉ स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नऊ दिवसांत नऊ पैठण्या जिंकण्याची सुवर्णसंधी

नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत दररोज गरबा व दांडिया खेळण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या माध्यमातून दररोज एका भाग्यवान महिलेची निवड करून तिला मानाची सुंदर पैठणी सन्मानपूर्वक भेट दिली जाणार आहे. सलग नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात एकूण ९ महिलांना पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

स्पर्धेचे वैशिष्ट्यपूर्ण नियम:

हा लकी ड्रॉ गरबा व दांडिया खेळण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी खुला असेल.

दररोज लकी ड्रॉमधून एका भाग्यवान महिलेची निवड केली जाईल.

ज्या महिलेचे नाव एकदा लकी ड्रॉमध्ये येईल, तिचे नाव पुढील दिवसांच्या लकी ड्रॉमध्ये पुन्हा समाविष्ट केले जाणार नाही, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या स्पर्धेचा लाभ घेता येईल.

महिलांच्या उत्साहासाठी विशेष उपक्रम

नवरात्र उत्सव हा केवळ भक्तीचा उत्सव नसून महिलांच्या उत्साहाचा, आनंदाचा, संस्कृतीचा आणि एकतेचा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून माता-भगिनींना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत आणि त्यांचा उत्साह अधिक वाढावा, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे श्री. धनंजय काळोखे यांनी सांगितले आहे.

या उपक्रमामुळे लोणावळ्यातील प्रभाग क्रमांक १३ मधील नवरात्रोत्सवाचा उत्साह आणखी वाढणार असून, गरबा आणि दांडिया प्रेमी महिला वर्गामध्ये या स्पर्धेबाबत कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आई जगदंबेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, अशी प्रार्थना करत आयोजकांनी सर्व माता-भगिनींना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

इतर बातम्या