Breaking news

‘मिशन मौसम’ अंतर्गत सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा येथे स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथे भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था, पुणे यांच्या माध्यमातून ‘मिशन मौसम’ या महत्त्वपूर्ण प्रकल्पांतर्गत स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पुणे विभागातील अशा एकूण ९ ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे स्थापित करण्यात आली असून, त्यापैकी एक महत्त्वाचे केंद्र सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे विभागातील हवामान निरीक्षण आणि पर्जन्यमानाच्या नोंदी अधिक प्रभावीपणे संकलित करण्यास मदत होणार आहे.

या यंत्राच्या माध्यमातून भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणावरील पर्जन्यमान व हवामानविषयक माहिती अचूकपणे आणि तत्काळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. प्राप्त होणाऱ्या माहितीचा उपयोग भविष्यातील हवामान विश्लेषण, संशोधन तसेच नागरिकांना उपयुक्त हवामानविषयक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी होणार आहे.

या प्रकल्पामुळे महाविद्यालयाला भारत सरकारच्या एका महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याची संधी मिळाली आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेसारख्या प्रगत संशोधन संस्थेबरोबर काम करण्याची आणि प्रत्यक्ष संशोधन प्रक्रियेचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

सदर प्रकल्प निर्धारित वेळेत कार्यान्वित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री यांचे मार्गदर्शन तसेच सिंहगड संकुलाचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीत प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था, पुणे येथील शास्त्रज्ञांशी समन्वय साधून सहप्रकल्प प्रमुख म्हणून यंत्राच्या स्थापनेपासून ते कार्यान्वित करण्यापर्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

या उपक्रमामुळे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा हे शिक्षणासोबतच प्रत्यक्ष संशोधन आणि राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक उपक्रमांमध्येही सक्रिय योगदान देत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

इतर बातम्या