महत्वाची बातमी l लोणावळ्यात अतिक्रमण काढून घेण्यासाठी नगरपरिषदेकडून नागरिकांना दोन दिवसांची मुदत
लोणावळा : लोणावळा शहरामध्ये मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईने दोन दिवस ब्रेक घेतला असून नागरिकांना स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांमध्ये नागरिकांनी अतिक्रमणे काढून न घेतल्यास सोमवारी लोणावळा नगरपरिषदेकडून सदरची अतिक्रमणे काढली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख मनोज पाटील यांनी केली आहे.
लोणावळा शहरामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याची मोहीम 18 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. कुमार रिसॉर्ट ते भांगरवाडी दरम्यान ही कारवाई केली जाणार आहे. मागील तीन दिवसांमध्ये कुमार रिसॉर्ट ते बाजार भाग परिसरामध्ये कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी अतिक्रमणे काढून घेण्यासाठी दोन दिवसाचे मुदत द्यावी अशी मागणी लोणावळा नगर परिषदेकडे केली होती त्या मागणीचा आदर करत शनिवार व रविवार दोन दिवस नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी देण्यात आले आहेत. या दोन दिवसांमध्ये नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून न घेतल्यास सोमवारी पुन्हा अतिक्रमण कारवाई करत राहिलेली अतिक्रमणे दूर करत रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले जाणार आहेत. सोबतच दिवसभर व रात्री देखील लोणावळा नगर परिषदेचे फिरते अतिक्रमण पथक मार्गाची पाहणी करणार आहे नव्याने पुन्हा कोणी टपऱ्या हात गाड्या लावण्याचा प्रयत्न केला अथवा अतिक्रमण केले तर त्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे. लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी व रस्ते रुंद करण्यासाठी लोणावळा नगर परिषदेकडून ही अतिक्रमण कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
सदरची अतिक्रमण कारवाई करताना लोणावळा नगरपरिषदेकडून इमारतींवर लावण्यात आलेले दुकानांचे फलक काढण्यात आल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे योग्य आहे मात्र दहा फुटापेक्षा जास्त उंचावर दुकानांचे लावण्यात आलेले फलक काढून कोणती अतिक्रमण कारवाई झाली व त्या ठिकाणावर कोणती वाहने अथवा नागरिक जाणार आहेत हे न समजण्यासारखे असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. नगर परिषदेने केलेली कारवाई ही योग्य व गरजेची असल्याची भावना अनेक जण व्यक्त करत आहेत मात्र ही कारवाई करत असताना ती सरसकट करावी एकाला एक न्याय व दुसऱ्याला एक न्याय असा दुजाभाव कारवाई मध्ये ठेऊ नका अशी विनंती वजाबाकी नागरिकांनी केली आहे.



















