Dehugaon News l दिव्यांगांच्या मागण्यांसाठी देहू ते आळंदी दुचाकी रॅली; प्रहार अपंग क्रांती आंदोलनाला पाठिंबा

देहूगाव : शासनदरबारी प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी सोमवारी (दि. 7 जुलै) सकाळी 11 वाजता प्रहार अपंग क्रांती आंदोलनाला पाठिंबा म्हणून देहू ते आळंदी दरम्यान दिव्यांग बांधवांनी दुचाकी रॅली काढली होती. ही रॅली प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या अमरावती ते यवतमाळ पदयात्रेला पाठिंबा म्हणून आयोजित करण्यात आली होती.
श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या महाद्वारातून रॅलीची सुरुवात झाली. यानंतर रॅलीने तळवडे, चिखली, कुदळवाडी, मोशी, डुडूळगाव मार्गे आळंदीकडे प्रस्थान केले. आळंदी येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत पिंपरी-चिंचवड प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, महिला अध्यक्षा संगीता जोशी, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रामचंद्र कांबळे, रमेश तांबे, रमेश पिसे, सज्जू धोंडफोडे आणि सुमारे 250 हून अधिक दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या रॅलीमुळे सामाजिक न्यायाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आहे.