अभिमानास्पद ! रिक्षा चालकाच्या मुलाने वयाच्या 22 व्या वर्षी मिळवली ‘सीए’ पदवी

हलाखीच्या परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि कष्टातून घडले यश; परिसरातील विद्यार्थ्यांसाठी बनला प्रेरणास्त्रोत
लोणावळा : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या मे 2025 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, टाकवे खुर्द (ता. मावळ) येथील पंकज बाळासाहेब पिंपरे याने अवघ्या 22 व्या वर्षी ‘सीए’ पदवी प्राप्त करून परिसरात गौरवाची लाट निर्माण केली आहे.
पंकजचे वडील बाळासाहेब पिंपरे हे रिक्षाचालक असून संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण करताना त्यांना आर्थिक चणचण भोगावी लागत होती. पंकजचे प्राथमिक शिक्षण टाकवे येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण लोणावळा येथे झाले. कोरोना काळात कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. परीक्षा फी भरण्यासाठी घरच्यांना दागिने गहाण ठेवावे लागले. मात्र, परिस्थितीवर न हार मानता, पंकजने केवळ दोन महिन्यांच्या अभ्यासात सीए फाऊंडेशन परीक्षा उत्तीर्ण केली.
यानंतर सीए इंटरच्या दोन्ही ग्रुप्स त्याने पहिल्याच प्रयत्नात पार केले. नोव्हेंबर 2024 मध्ये त्याने सीए फायनल परीक्षा दिली, पण परीक्षा सुरू होण्याच्या आठवडाभर आधी त्याच्या आजीचे निधन झाले. या दुःखद प्रसंगाचा मानसिक धक्का बसून त्याला अपयश आले. मात्र जिद्द न सोडता, पुढील अडीच महिन्यांत दररोज 15 ते 17 तास अभ्यास करत त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि यशस्वीरीत्या सीए फायनल पास करत हे यश संपादन केले.
पंकज सांगतो की, या प्रवासात त्याचे वडील बाळासाहेब, आई सुजाता, तसेच सीए गुरुदेव गरुड आणि सीए स्नेहल गरुड यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मोलाची ठरली. तो सांगतो, “माझ्या यशामध्ये माझ्या कुटुंबीयांचा आणि गुरूजनांचा मोलाचा वाटा आहे. मीही भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची इच्छा बाळगतो.” पंकजच्या या प्रेरणादायी यशामुळे मावळातील अनेक तरुणांना नवसंजीवनी मिळाली आहे. टाकवे ग्रामस्थांसह संपूर्ण मावळ तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.