अखेर लोणावळा नगरपरिषदेने घेतला मोकळा श्वास; इमारतीच्या भिंतीवर लावलेले फ्लेक्स हटवले - फ्लेक्स लावणाऱ्यांना 5 हजार रुपये दंड आकारला जाणार - सभापती धनंजय काळोखे
लोणावळा : मागील अनेक महिन्यांपासून फ्लेक्स च्या विळख्यामध्ये सापडलेली लोणावळा नगर परिषदेची मुख्य प्रशासकीय इमारत अखेर फ्लेक्स मुक्त झाली आहे. त्यामुळे इमारतीने थोडा मोकळा श्वास घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोणावळा नगर परिषदेच्या वतीने इमारतीच्या भिंतीवर लावण्यात आलेले सर्व अनधिकृत फ्लेक्स काढून टाकले असून यापुढे या ठिकाणी फ्लेक्स लावल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आरोग्य समितीचे सभापती धनंजय काळोखे यांनी दिला आहे.
लोणावळा बाजारपेठेमध्ये नगर परिषदेची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. या इमारतीच्या गेटच्या बाजूला तसेच बाजार बाजूकडील संपूर्ण भिंतीवर जागोजागी वेगवेगळे फ्लेक्स लावण्यात आले होते. यामुळे नगर परिषदेच्या इमारतीला बकालपणा आला होता. अनेक वेळा याबाबत माध्यमांनी आवाज उठवला मात्र नगर परिषदेने कोणतीही कारवाई केली नव्हती. स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला मात्र लोणावळा नगरपरिषदेने या अनधिकृत फ्लेक्स वर कारवाई करत सर्व फ्लेक्स काढून टाकले आहेत. या पुढील काळात इमारतीच्या कोणत्याही भिंतीवर कोणीही फ्लेक्स लावू नयेत या ठिकाणी फ्लेक्स लावणाऱ्या व्यक्तींवर व फ्लेक्स धारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पाच हजार रुपये इतका दंड या फ्लेक्स लावणाऱ्यांवर लावला जाणार असल्याची माहिती सभापती काळोखे यांनी दिली. तसेच शहरामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरामध्ये देखील कोणीही फ्लेक्स लावू नयेत. त्या ठिकाणी देखील फ्लेक्स लावलेले आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल व फ्लेक्स फ्रेम नगरपरिषद जप्त करेल असे देखील सांगण्यात आले आहे.
लोणावळा नगर परिषदेच्या इमारतीप्रमाणेच स्ट्रीट लाईटच्या खांबावर देखील मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. तसेच इंद्रायणी नदीवरील फुलांच्या सुरक्षा जाळ्यांवर व कुमार रिसॉर्ट जवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या जाळ्यांवर अनधिकृत रित्या फ्लेक्स लावण्यात आले आहेत. भांगरवाडी येथील नगर परिषदेच्या शाळेची भिंत ही देखील फ्लेक्सने भरली आहे. नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता अनेक ठिकाणी अनधिकृतरीत्या फ्लेक्स लावून शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे. त्यावर देखील लोणावळा नगरपरिषदेने कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.



















