वाकसई येथील त्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात 18 नोव्हेंबर रोजी हिंदू राष्ट्रसेनेचे रास्ता रोको आंदोलन
लोणावळा : वाकसई सदापूर फाटा येथील अनधिकृत बांधकाम व धार्मिक स्थळ याविरोधात येत्या 18 नोव्हेंबर 2026 रोजी हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सदरच्या बांधकामाला कोणत्याही प्रकारची परवानगी वाकसई ग्रुप ग्रामपंचायत व पीएमआरडीए यांनी दिलेली नाही, असे असताना तसेच पीएमआरडीए यांनी सदरचे बांधकाम आदेश मिळाल्यापासून पंधरा दिवसात स्वखर्चाने ते काढून घ्या असे 29 जुलै 2026 रोजी कळवलेली असताना देखील अद्याप सदरचे अनधिकृत बांधकाम काढण्यात आलेले नाही. त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने 60 दिवसात या बांधकामाच्या सत्यते बाबतची कागदपत्रे पीएमआरडीए कडे सादर करण्याची मुदत दिली होती. ती मुदत देखील पाच नोव्हेंबर रोजी संपली आहे. मात्र कोणतेही दस्तऐवज अद्याप सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सदरचे अनधिकृत बांधकाम 17 नोव्हेंबर पर्यंत पीएमआरडीएने निष्कासित करावे, अन्यथा 18 नोव्हेंबर रोजी कार्ला फाटा ते सदापूर फाटा दरम्यान भव्य मोर्चा काढत त्या ठिकाणी विराट रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेत देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी व वाकसाई ग्रामपंचायत सदस्य म्हणाले मागील चार ते पाच वर्षापासून कायदेशीर मार्गाने आम्ही या विरोधात लढा देत आहे. वाकसई ग्रामपंचायत ने देखील सदरच्या बांधकामाला कोणतीही परवानगी ग्रामपंचायतने दिली नसल्याचे म्हटले आहे. तसेच ग्रामस्थांनी देखील ठराव करून सदरचे बांधकाम काढण्याबाबत मागणी केली आहे. पीएमआरडीए ने स्वतः सदरचे बांधकाम अनधिकृत ठरवत ते काढून घेण्याबाबत संबंधितांना आदेश देखील दिलेले आहेत. कायदेशीर व सनदशीर मार्गाने हिंदूराष्ट्र सेना हा लढा देत असताना प्रशासकीय यंत्रणांनी आमच्या संयमाचा अंत पाहू नये. 17 नोव्हेंबर पर्यंत सदरचे बांधकाम निष्काशीत न झाल्यास 18 नोव्हेंबर रोजी आंदोलन करत हिंदूराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते स्वतः कायदा हातात घेऊन सदरचे बांधकाम निष्कासित करतील यानंतर होणाऱ्या परिणामांना प्रशासकीय यंत्रणा सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद सर्व प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी असा इशारा देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हिंदुराष्ट्र सेनेने दिला आहे.


















