कैवल्यधाममध्ये रंगला ‘शंखनाद संगम’; अभिनेता विद्युत जामवाल यांच्या मार्गदर्शनाने योगप्रेमी भारावले
लोणावळा : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील जागतिक कीर्तीच्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये एक विशेष आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला. इंडियन योगा असोसिएशन आणि कैवल्यधाम योग संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ‘शंखनाद संगम’ या कार्यक्रमाला प्रसिद्ध सिने अभिनेता आणि मार्शल आर्टिस्ट, तसेच इंडियन योगा असोसिएशनचे ब्रँड ॲम्बेसिडर विद्युत जामवाल यांनी उपस्थिती लावत उपस्थितांना योगासनांच्या पलीकडे जाऊन ‘ध्वनी’ आणि ‘श्वासाच्या’ विज्ञानाची ओळख करून दिली.
शंखनाद आणि श्वासावर नियंत्रण
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण विद्युत जामवाल यांनी विविध प्रकारचे शंख वाजवून त्यातून निर्माण होणारा नाद आणि त्याचे शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम यांचे सादरीकरण होते. शंख वाजवणे हे केवळ एक वाद्य नसून, ते श्वासावर नियंत्रण मिळवण्याचे एक प्रभावी तंत्र आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. जामवाल म्हणाले की, ज्याचे आपल्या श्वासावर पूर्ण नियंत्रण आहे आणि जो यौगिक जीवनशैलीचा अवलंब करतो, तोच खऱ्या अर्थाने निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो.
ओमकार आणि गायत्री मंत्राचे गुह्य
यावेळी विद्युत जामवाल यांनी उपस्थितांना ‘ओमकार’ उच्चारण्याचे शास्त्र समजावून सांगितले. ओमकारचा नाद कशा प्रकारे मनावर आणि श्वासावर नियंत्रण मिळवण्यास मदत करतो, याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. तसेच, गायत्री मंत्राचा महिमा सांगताना, मंत्रातील प्रत्येक शब्दातून निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरींचा शरीरावर आणि मनावर होणारा सकारात्मक परिणाम त्यांनी स्पष्ट केला. या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्यासोबत शंखनाद करत कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी, कैवल्यधाम योग संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव सुबोध तिवारी यांच्या हस्ते विद्युत जामवाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कैवल्यधाममधील विविध कोर्सेसचे विद्यार्थी आणि लोणावळा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. श्वास आणि नादाच्या माध्यमातून आरोग्याचा नवा दृष्टिकोन देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.






















