महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला पण पावसाचे काय? पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतातूर
लोणावळा : महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी मान्सूनच्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. मे महिन्याची अखेर ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मावळ तालुक्यात बहुतांश ठिकाणी भात रोपांची पेरणी केली जाते. यंदा मात्र पावसाने ओढ दिली असून बळीराजा चिंता दूर झाला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा ह्या आभाळाकडे व आकाशातून पळणार्या काळ्या ढगांकडे लागल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी पावसाचे काय असा प्रश्न होता निर्माण झाला आहे.
मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रात दाखल झालेल्या पावसाने यंदा मात्र जून महिन्याची दहा तारीख ओलांडली तरी हजेरी न लावल्यामुळे सर्वांच्या नजरा ह्या पावसाकडे लागल्या आहेत. मावळ तालुका हा पावसाचा तालुका व भात शेतीचा तालुका म्हणून ओळखला जातो. मावळातील जवळपास 1300 हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. साधारणपणे घाटमाथ्यावर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. या पावसाच्या अंदाजावर मे महिन्याच्या अखेरीपासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भात रोपांची पेरणी केली जाते व पाऊस पडल्यानंतर ह्या रोपांची उगवण होते. यंदा मात्र भात रोपांची पेरणी झाली असली तरी पाऊस पडत नसल्यामुळे रोपांची योग्य प्रकारे उगवण होणार का याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. पवनानगर भागातील काही क्षेत्रांमध्ये पाण्यावर भात रोपे तयार करण्यात आली आहेत. असे असले तरी भात लावण्यासाठी आवश्यक पाऊस अद्याप या भागात झालेला नाही.
लोणावळा, खंडाळा, आंदर मावळ, पवन मावळ हा सर्व परिसर पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील विविध गावांमधील नागरिकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनावर अवलंबून आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे या सर्वांच्या देखील नजरा मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहेत. हवामान विभागाने महाराष्ट्र मध्ये मान्सून सक्रिय झाला असल्याचे सांगितले असले तरी थोडक्यात भाग उघडता कोठेही मान्सूनच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. लोणावळा घाट माथ्यावर देखील अवकाळी पाऊस चार-दोन वेळात झाला असला तरी मान्सूनला अद्याप सुरुवात झालेली नसल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला पण पावसाचे काय असा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.






















