Kusgaon News l संजय गुंड यांचे कुसगाव ग्रामपंचायतीचे सदस्यत्व कायम

लोणावळा : कुसगाव ग्रामपंचायतीचे सदस्य संजय तुकाराम गुंड यांचा राजीनामा नामंजूर करत त्यांचे सदस्यत्व कायम ठेवण्यात यावे असा आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
2021 साली झालेल्या कुसगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संजय गुंड सदस्य म्हणून निवडून आले होते. 27 जुलै 2022 रोजी ते ग्रामपंचायत कार्यालयात मीटिंगसाठी गेले असता त्यांना तुमचा राजीनामा मंजूर झाला असून तुमचे सदस्य पद रिक्त झाले असल्याने तुम्हाला मीटिंगला बसता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यावेळी त्यांनी मी राजीनामा दिला नाही मंग तो मंजूर कसा झाला व कोणी माझा राजीनामा लिहून दिला असल्याची विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
सदरचा तथाकथित राजीनामा गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. ग्रामपंचायत मासिक सभेत हा विषय विषय पत्रिकेत न घेता ऐन वेळचा विषय म्हणून घेण्यात आला. याबाबत अनेक कायदेशीर बाबी, वाद विवाद, जबाब नोंदवल्यानंतर सदरचा राजीनामा मंजूर करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदींचे पालन व विहित कार्यपद्धतीचा अवलंब केला नसल्याचे निरीक्षण नोंदवत हा राजीनामा संजय गुंड यांनी दिलेला नसल्याचे अधोरेखित करत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संजय गुंड यांचा 30/06/2022 रोजी मंजूर केलेला राजीनामा नामंजूर करत सदस्य पद कायम ठेवण्याचा आदेश 13/05/2025 रोजी दिला आहे.