Breaking news

Lonavala News l आयटीआय लोणावळा येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

लोणावळा : क्रांतिकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणावळा येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्हा कुटुंब प्रबोधन प्रमुख प्रमोद देशपांडे, आयएमसी सदस्य राजेश येवले व ॲड. अरविंद गोतारणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

     कार्यक्रमाची सुरुवात माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सचिव श्रीमती मनिषा वर्मा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच ‘कौशल्य गीत’ सादर करून प्रशिक्षणार्थींचे मनोबल वाढविण्यात आले.

      मुख्य वक्ते प्रमोद देशपांडे यांनी पंचपरिवर्तन या संकल्पनेवर आधारित मार्गदर्शन करताना स्वदेशी विचार, नागरी कर्तव्य, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण आणि कुटुंब प्रबोधन या विषयांवर सखोल विचार मांडले.

त्यांनी नमूद केले की, 2047 पर्यंत आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीत आयटीआयमधील युवकांचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने शक्यतो स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात, स्वनिर्मितीकडे वळावे, आणि स्वतःच्या कुटुंबापासून पर्यावरणापर्यंत सकारात्मक बदल घडवावा. नागरी कर्तव्यांचे पालन, स्वच्छता, कर भरणा, पर्यावरण रक्षण, आणि विविधतेतून एकता साधणे ही काळाची गरज आहे.

पर्यावरणाबाबत बोलताना त्यांनी '3P' - पेड (झाडे), पाणी, प्लास्टिक या बाबींचे भान ठेवण्याचे आवाहन केले. झाडे लावणे आणि संवर्धन करणे, पाण्याचा योग्य वापर आणि प्लास्टिकच्या वापराचे टाळणे या गोष्टींचे महत्त्व अधोरेखित केले. कुटुंब प्रबोधनाच्या संदर्भात ‘सहा भ’ – भाषा, भूषा, भवन, भोजन, भजन आणि भ्रमण यांचा योग्य समन्वय राखल्यास समाज अधिक सुदृढ व आनंदी होईल, असेही त्यांनी नमूद केले.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटनिदेशक पासलकर सर होते. श्री. पाटील सर व श्री. रापतवार सर यांनीही उपस्थित राहून सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी शिवरामवार व श्रीमती सुप्रिया साबळे यांनी तर आभारप्रदर्शन प्रभात राठोड यांनी केले.

इतर बातम्या