Breaking news

Lonavala News : लोणावळ्यात स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्त 15 शक्तीपीठांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळा

लोणावळा : शंकरबन प्रतिष्ठान कडून सालाबाद प्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाच्या निमित्त दि.10 एप्रिल व 11 एप्रिल 2024 रोजी ब्रह्मांडनायकाचा प्रगट दिन सोहळा हा सार्वजनिक अध्यात्मिक  कार्यक्रम सुमित्रा सभागृह भांगरवाडी  लोणावळा ता. मावळ जिल्हा पुणे येथे साजरा करण्यात येणार आहे

       या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण दि.10 एप्रिल 2024 रोजी स्वामी समर्थ महाराज प्रगटदिनी दत्त सांप्रदायातील 15 शक्तीपीठांच्या सिद्ध पादुकांचा भव्य दर्शन सोहळा आयोजित  करण्यात आला आहे. यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज, श्री शंकर बाबा महाराज, श्री चिले बाबा महाराज, श्री साईनाथ महाराज, श्री गजानन महाराज, श्री वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी महाराज, श्री श्रीधर स्वामी महाराज, श्री साई गगनगिरी महाराज, श्री चैतन्य कानिफनाथ महाराज, श्री बाळूमामा, श्री दत्त गुरु गिरनारी महाराज, श्री सद्गुरू शिवाजी महाराज विडणी, जगद्गुरु संत तुकाराम महाराज या विभूतींच्या सिद्ध चरण पादुकांचा चैतन्यस्पर्श पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

        या दिवशी दुपारी बारा व सायंकाळी सात वाजता महिला भगिनींच्या हस्ते स्वामी समर्थ महाराजांची सामुहिक महाआरती व नैवेद्य अर्पण सोहळा संपन्न होणार आहे. तसेच दुपारी 12:00 वाजल्यापासून महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत सुप्रसिद्ध गायक योगेशजी तपस्वी यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 07:30 ते 09:00 पर्यंत महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. तरी लोणावळ्यातील तमाम नागरिकांनी व भक्त परिवाराने या सार्वजनिक सोहळ्यात सहभागी होऊन पादुका दर्शन सोहळा, कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

     श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनी दुपारी 12:00 वाजता उपस्थित सर्व महिला भगिनींच्या हस्ते श्री स्वामी महाराजांची सामुहिक आरती संपन्न होणार आहे. तरी या आरती सोहळ्यासाठी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक नैवेद्य आरती सोहळ्याचा लाभ घ्यावा तसेच स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य पुरणपोळी आपापल्या घरून स्वच्छने घेऊन यावा असे आवाहन शंकरबन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर उर्फ राजू दादा निकम यांनी केले आहे.

इतर बातम्या