Breaking news

Dr. Appasaheb Dharmadhikari; प्रसिद्ध निरुपणकार डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

लोणावळा : रेवदंडा (जि. रायगड) येथील ज्येष्ठ निरुपणकार डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणेजच 27 वा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे अनुयायी असलेल्या जगभरातील लाखो-करोडो श्री सदस्य आनंदोत्सव साजरा करत आहे.

महाराष्ट्र भूषण स्व. डॉ नारायण उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र असलेले दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अध्यात्म आणि सामाजिक सेवेचा त्यांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ सचिन दादा धर्माधिकारी हे देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन समाजसेवेचा आणि अध्यात्मविद्येचा वारसा चालवत आहेत. स्व. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनाही मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात पिता-पुत्रांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.

      श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग येथून आप्पासाहेब धर्माधिकारी जगभर पसरलेला सगळा कार्यभाग सांभाळत असतात. यासह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत समाजसेवेचे कार्य अविरत सुरु असते. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचले आहे. त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 सालापासून या कार्याला सुरुवात केली. ग्रंथराज श्रीमत दासबोध घराघरात पोहचवून त्याच्या आधारे आणि आपल्या प्रासादिक वाणीने, मौखिक निरुपणाच्या साहाय्याने श्री बैठकांद्वारे नानासाहेबांनी प्रत्येकाच्या हृदयात अढळ स्थान मिळवले. आज तेच कार्य, तेवढ्याच ताकदीने डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी जगभर पोहोचवत आहेत. त्यांच्या कार्याचा आज महाराष्ट्र शासनाने उचित गौरव केला, असेच म्हणावे लागेल.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वी मिळालेले पुरस्कार

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वीच देशाचा चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान पद्मश्रीने 2017 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2014 मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. यासह युरोपियन विद्यापीठाच्या वतीने 'द लिव्हिंग लेजंड' पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

इतर बातम्या