Mumbai Pune Express Way l मुंबई पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंकच्या बोगद्या समोर दरड पडल्याने वाहतूक बंद
लोणावळा : लोणावळा शहर व घाटमाथ्यावर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या तोंडाजवळ दरड कोसळले आहे. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक ची वाहतूक बंद झाली आहे तसेच मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पाणी साचल्यामुळे याही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर नायगाव साते वडगाव या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल येथील बोगद्यासमोर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक देखील ठप्प झाली आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर निसर्गाचा कोप झाल्याप्रमाणे प्रचंड पाऊस सुरू आहे. 24 तासात 625 मिमी इतका पाऊस नोंदवण्यात आला असून पावसाचा जोर अजून देखील कायम आहे. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. मावळ तालुक्यातील पाटण गावात दरड कोसळली आहे, पवन मावळतील ओझर्डे येथील रस्ता वाहून गेला आहे, लोणावळ्यातील पांगोळी येथील स्मशानभूमी जवळ दरड कोसळली आहे, खंडाळ्यातील रस्टिक येथे काही प्रमाणात माती संख्खलित होऊन खाली आली आहे.





















