राजमाचीकडे जाणाऱ्या पर्यटकांनो सावधान ! राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कातळधार जवळ दरड कोसळली; राजमाची कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद, अनेक पर्यटक अडकले
लोणावळा : लोणावळा शहर व परिसरामध्ये शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कातळधार जवळ मोठी दरड कोसळली आहे. ही दरड व राडाराडा रस्त्यावर आल्यामुळे राजमाची कडे जाणारा रस्ता हा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यामुळे राजमाची किल्ला परिसरामध्ये गेलेल्या पर्यटकांना त्यांची वाहने त्याच बाजूला ठेवून पायवाटेने लोणावळ्याकडे यावे लागले आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर डेला ऍडव्हेंचर क्लब यांच्या मदतीने जेसीबी मशीनच्या सहाय्याने दुपारी दीड वाजल्यापासून सदरची दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत शक्य तेवढी माती व दगड बाजूला करत पर्यटकांसाठी पायवाट सुरू करण्यात आले आहे मात्र संपूर्ण दरड बाजूला करण्यासाठी अजून किमान एक दिवस तरी लागेल असे सांगितले जात आहे.
लोणावळा खंडाळा व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस व त्यासोबत वाहणारे वारे यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडणे पाणी साचणे असे प्रकार घडले आहेत. लोणावळा शहरापासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर राजमाची किल्ला आहे या ठिकाणी काही हौशी पर्यटक ट्रेकिंग साठी जात असतात. या किल्ल्याकडे जाण्यासाठी छोटा रस्ता आहे. या रस्त्यावर कातळधार धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गाच्या जवळपास ही दरड कोसळल्यामुळे संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दुचाकी वाहन देखील या ठिकाणाहून जात नाही. दिवसभराच्या रेस्क्यू नंतर या ठिकाणाहून पायी जाण्यासाठी छोटीशी पायवाट तयार करण्यात आली आहे त्यामुळे राजमाची किल्ल्याहून माघारी येणाऱ्या पर्यटकांना किमान पायवाटेने येणे शक्य झाले आहे. काही पर्यटकांची दुचाकी व चार चाकी वाहनेही रस्त्याच्या विरुद्ध बाजूला अडकून पडली आहेत पूर्ण दरड बाजूला केल्यानंतरच ही वाहने घेऊन येता येणार आहेत. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळेस या ठिकाणी कोणीही नव्हते त्यामुळे मोठी हानी ठरली आहे.
राजमाची किल्ल्याचा परिसर हा दुर्गम व जंगल भाग असल्यामुळे या ठिकाणी पावसाच्या वेळेत जाणे धोकादायक आहे. अनेक ट्रेकर्स व पर्यटकांचा या भागांमध्ये अपघात देखील झालेला आहे. सध्या लोणावळा परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पर्यटकांनी दुर्गम ठिकाणी जाणे टाळावे. सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लोणावळा राजमाची रस्त्यावर दरड पडल्यामुळे राजमाची कडे जाणारा रस्ता बंद झाला आहे त्यामुळे रविवारी या किल्ल्याकडे जाण्याचा प्रयत्न पर्यटकांनी करू नये असे देखील सांगण्यात आले आहे.
लोणावळा शहरात शनिवारी दिवसभरात 105 मिमी पावसाची नोंद
लोणावळा शहरात शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांमध्ये 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी 24 तासात शहरात 121 मिमी पाऊस झाला होता. 30 जून पासून लोणावळा शहरामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे. संततधार कोसळणाऱ्या या पावसामुळे लोणावळा शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असल्यामुळे नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे देखील आवाहन करण्यात आले
आहे.





















