लोणावळा शहरातील जुन्या पोलीस स्टेशनवर दगडफेक; अधिकारी कक्षाच्या काचा फोडल्या
लोणावळा : लोणावळा शहरातील जुन्या पोलीस स्टेशनवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करत अधिकारी कक्षाच्या काचा फोडल्या आहेत. 6 जुलै रोजी लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्या पुराचा फटका पोलीस स्टेशनला देखील बसला. पोलीस ठाण्यात देखील पाणी घुसल्याने लोणावळा बाजारातील पोलीस स्टेशनचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतरण करण्यात आले होते. तेव्हापासून बाजार भागातील पोलीस स्टेशन हे रिकामे होते. त्याठिकाणी पोलीस नाहीत याचा अंदाज घेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पोलीस स्टेशनवर दगडफेक करत पोलीस स्टेशनमधील अधिकारी कक्षाच्या काचा फोडल्या आहेत.
लोणावळा बाजारभागातील वाहतूक कोंडी व त्या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या निमित्ताने लोणावळा बाजार पेठेतील जुने पोलीस स्टेशन हे पुन्हा कार्यान्वित करत त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणार असल्याचे नुकतेच प्रभारी पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी सांगितले होते. मागील दोन तीन महिन्यापासून सदरचे पोलीस स्टेशन हे रिकामी असल्यामुळे त्याची साफसफाई व स्वच्छता करत लवकरात लवकर ते पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने पोलीस स्टेशनची पाहणी केली असता अधिकारी एक कक्षाच्या काचा कोणीतरी दगडफेक करून फोडल्या आहेत. सर्व कक्ष हे रिकामे पडल्यामुळे कचऱ्याने भरले आहेत. अधिकारी कक्षाच्या काचांवर ही दगडफेक नेमकी कोणी व कधी केली याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी झालेली घटना ही चुकीची व निंदनीय आहे. पोलीस हे शहराचे व शहरातील नागरिकांचे रक्षणकर्ते आहेत. त्यांच्यामुळेच शहरात कायदा व सुव्यवस्था राखली जाते. एखादे पोलीस स्टेशन रिकामे आहे अथवा वापरात नाही म्हणून त्यावर दगडफेक करत त्या वास्तूच्या काचा फोडणे हे अतिशय दुर्दैवी व चुकीचा प्रकार असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत.


















