Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळ्यात मागील 24 तासात 131 मिमी पावसाची नोंद; आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मान्सूनचे पुनरागमन; रविवारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

लोणावळा : पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात तब्बल आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. रविवारी २८ जून रोजी दुपारनंतर अचानक ढगांच्या गडगडाटासह शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. 24 तासात शहरात तब्बल 131 मिमी (5.16 इंच) पावसाची नोंद झाली आहे. २७ जून रोजी सायंकाळीही पावसाने हलकी हजेरी लावली होती, मात्र रविवारी दुपारनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढलेला पाहायला मिळाला.

      जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून यंदा तब्बल १५ दिवस उशिराने म्हणजेच २० जून रोजी लोणावळ्यात दाखल झाला होता. आगमन झाले त्या संपूर्ण दिवस आणि रात्र पावसाचा जोर कायम होता. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारली. मागील चार-पाच दिवसांपासून लोणावळा शहरात प्रचंड उष्णता वाढली होती. रविवारी सकाळपासून नागरिकांना उन्हाचे मोठे चटके सहन करावे लागले. पण दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी

लोणावळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, मात्र यंदा पावसाचे प्रमाण चिंताजनक आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत (29 जून) लोणावळा शहरात तब्बल १८८५ मिमी (74.21 इंच) पावसाची नोंद झाली होती. याच्या उलट, यावर्षी मात्र आजअखेरपर्यंत जेमतेम  393 मिमी (15.47 इंच) पाऊस झाला आहे. त्यामुळे कालच्या पावसाने जरी दिलासा दिला असला, तरी गतवर्षीची सरासरी गाठण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

      रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होती. दुपारनंतर अनेक पर्यटक परतीच्या मार्गावर असतानाच हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे परतीच्या प्रवासात पर्यटकांना या पावसाचा मनमुराद आनंद घेता आला. मात्र, अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पादचारी आणि स्थानिक नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.

इतर बातम्या