लोणावळ्यातील रायवुड परिसरातील बंगल्यात बेकायदेशीर घुसखोरी करून तुफान राडा; महिलांना मारहाण व तोडफोड प्रकरणी 28 जणांवर गुन्हा दाखल
लोणावळा : लोणावळा शहरातील रायवुड परिसरातील एका बंगल्यात बेकायदेशीरपणे घुसून महिलांना मारहाण करणे, घरातील साहित्याची फेकाफेक करून मालमत्तेचे नुकसान करणे आणि मध्यस्थीसाठी आलेल्या नगरसेवकाला दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तब्बल 28 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काही महिला बाउन्सर यांचा देखील समावेश आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज, सोमवार (दि. १७ ऑगस्ट २०२६) रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. लोणावळा गावच्या हद्दीत कुरवंडे ते जुना खंडाळा जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या रायवुड येथील 'लाल चिमणी बंगल्या'तील माळी रूमसमोर हा प्रकार घडला.
याबाबत मनीषा मनोहर देशमुख (वय ५२, व्यवसाय: माळी काम, रा. लाल चिमणी बंगला, रायवुड, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नेमकी घटना काय घडली?
तक्रारदार मनीषा देशमुख आणि त्यांची जाऊ राजश्री राजू देशमुख या माळी रूममध्ये असताना आरोपी राजू नागनाथ विरकर, साईनाथ सुनील धोत्रे, आम्रपाली राम सूर्यवंशी, भाग्यश्री श्रीमंत कसबे, आयोध्या सुभाष कांबळे, हमा किसन गोसावी, सोनाली विजय तुपसुंदर, पल्लवी प्रसाद सोहणे, कामेश्वरी माधवन आरमुगम, पंकज साहेबराव शिंदे, सनी अरुण भसे, अनिता विकी भडकवाड, वहिता शेख, मंदाकिनी शिवाजी पवार, कल्पना प्रमोद सोनकांबळे, वर्षा राजेंद्र लोखंडे (सर्व रा. पुणे व परिसर) आणि इतर १० ते १२ अनोळखी इसमांनी बेकायदेशीर टोळके जमवून घरात घुसखोरी केली.
आरोपींनी मनीषा देशमुख व त्यांच्या जावेला हाताने जबर मारहाण केली. तसेच रूममधील भांडी बाहेर फेकून दिली. बंगल्याच्या अंगणातील पाण्याच्या टाकीचे पाईप, पाण्याची मोटर, केळीची झाडे व इतर झाडे तोडून मोठे नुकसान केले.
नगरसेवकाला दमदाटी व अपमान
घटना घडत असताना मारहाणीचा आवाज ऐकून मदतीसाठी धावून आलेले स्थानिक नगरसेवक धनंजय वसंत काळोखे (रा. ठोंबरेवाडी, लोणावळा) यांनाही आरोपींनी आरेरावीची भाषा वापरून दमदाटी केली व त्यांचा अपमान केला.
नगराध्यक्ष, नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन तरी गुन्हा दाखल करण्यास विलंब
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष व दहा ते पंधरा नगरसेवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. दमदाटी अरेरावी व शिवीगाळ करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. अखेर दुपारी 12:30 नंतर नगरसेवकांनी पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन चालू केले. यावेळी पोलीस व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये शाब्दिक वाद देखील झाले. त्यानंतर देखील गुन्हे दाखल होत नव्हते अखेर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस स्टेशन बाहेर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा सर्व लोकप्रतिनिधींनी दिला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेले पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे तातडीने दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये आले. घटनेचा सर्व घटनाक्रम त्यांनी समजून घेऊन सायंकाळी साडेसहा नंतर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३३, १८९, १९०, ११५(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) शेखर कुलकर्णी करत आहेत.



















