Breaking news

अभिमानास्पद l सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माजी विद्यार्थ्याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचा माजी विद्यार्थी श्रीनिवास वांगे याने *ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA), चेन्नई येथील कठोर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर नियुक्ती मिळवली आहे. ही कामगिरी सिंहगड परिवारासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

श्रीनिवास वांगे याने आपल्या मेहनत, शिस्त, जिद्द, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेच्या भावनेच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे, श्रीनिवास हा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चा माजी स्वयंसेवक असून, NSS मधून अंगीकारलेल्या सेवा, शिस्त, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाच्या मूल्यांचा त्याच्या या प्रवासात निश्चितच महत्त्वाचा वाटा आहे. NSS स्वयंसेवक ते भारतीय सैन्यातील अधिकारी हा त्याचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल लोणावळा कॅम्पसचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी NSS विभागाने लेफ्टनंट श्रीनिवास वांगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, राष्ट्रसेवेच्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“अभिमानास्पद माजी विद्यार्थी ते अभिमानास्पद अधिकारी!”

श्रीनिवास वांगे यांचे हे यश संस्थेतील विद्यार्थ्यांना देशसेवा, कठोर परिश्रम आणि ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा देणारे आहे. सिंहगड विद्यालयातील अभिमानास्पद कामगिरी करणारा विद्यार्थी ते अभिमानास्पद अधिकारी अशी त्याची वाटचाल राहिली आहे.

इतर बातम्या