नंदकुमार वाळंज यांना ‘आदर्श महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार; समाजहिताच्या कार्याचा गौरव
लोणावळा : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन, बीबीएल मराठी न्यूज नेटवर्क तसेच भारत पब्लिकेशन न्यूज नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्टार आयकॉन अवॉर्ड २०२६’ पुरस्कार सोहळा पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात आंबवणेकर व मुळशी परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक, कोराईगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार वाळंज (बाबूजी) यांच्या दीर्घकाळच्या समाजहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे मावळ-मुळशी परिसरात वाळंज यांच्या सामाजिक, शैक्षणिक व समाजोपयोगी कार्याचे विशेष कौतुक होत असून, त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन डॉ. राजीव लोहार व त्यांच्या पब्लिकेशनच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्तीताई देसाई, समाजसेवक नंदकुमार वाळंज, दिलीप बगाडे, पियू धनवडे-कोल्हापूरकर, राणी बबिता मुसळे, ह.भ.प. कृष्णा फाटे महाराज, ॲड. दिलीप जगताप, डॉ. सुचिता पाटील, अभिजित संकाये पाटील, साक्षी कळवडेकर, मनीषाताई लोहार तसेच पब्लिकेशनचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांना या सोहळ्यात ‘महाराष्ट्र भूषण’, ‘जीवन गौरव’, ‘भास्कर भूषण’ आणि ‘स्टार आयकॉन’ यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरणापूर्वी उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे बालकलाकारांनी सादर केलेला बाल नृत्याविष्कार. या नृत्याविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या सोहळ्यास मावळ वार्ता फाउंडेशनचे संचालक सचिन पारख, लायन्स क्लबचे अध्यक्ष नवीन भुरट, निवृत्त आरटीओ अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग, मुख्याध्यापक शेलारभाऊ, देवरे सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
समाजसेवेचा दीर्घ प्रवास
नंदकुमार वाळंज यांनी आंबवणे व मुळशी परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान दिले आहे. कोराईगड शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची यापूर्वीही विविध पुरस्कारांनी दखल घेण्यात आली असून त्यांना मुळशी-मावळ भूषण, उद्योजक, ‘विश्व जीवन गौरव’ यांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, ‘स्टार आयकॉन अवॉर्ड २०२६’ सोहळ्यात प्रदान करण्यात आलेला ‘आदर्श महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा विशेष आणि मानाचा गौरव ठरला आहे. या सन्मानामुळे समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना नवी प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर नंदकुमार वाळंज यांनी आयोजकांचे आभार मानले. समाजहितासाठी सुरू असलेले कार्य यापुढेही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांनीही आयोजकांचे आभार मानत या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले.



















