Lonavala News l आखाड पार्टी करिता लोणावळा शहर हाऊसफुल; पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी
लोणावळा : आखाड पार्ट्या करण्यासाठी लोणावळा शहरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटकांच्या या गर्दीमुळे शहरातील सर्व पर्यटन स्थळे गजबजली असून हॉटेल, फार्म हाऊस व खाजगी बंगले हे पर्यटकांनी भरले आहेत. पुढील आठवड्यामध्ये श्रावण महिना सुरू होणार आहे. हा महिना सुरू होण्यापूर्वी आखाड पार्ट्या सर्वत्र जोरात चालतात. पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळा शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे पिंपरी चिंचवड व अन्य भागांमधून पर्यटक दाखल झाले आहेत. अनेक तरुण तरुणींचे ग्रुप खाजगी बंगल्यांमध्ये मुक्कामी आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आखाड पार्ट्या रंगल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोणावळा शहरामध्ये दीडशेहून अधिक लहान मोठी हॉटेल्स आहेत तर हजारो बंगले आहेत. बंगल्यांमध्ये फार नियमांचे पालन करावे लागत नसल्यामुळे पर्यटक हॉटेलमध्ये राहण्याऐवजी खाजगी बंगल्यांना प्राधान्य देत आहेत. या ठिकाणी स्विमिंग पूल मध्ये भिजण्याचा आनंद घेत पार्ट्या रंगत आहेत.
मागील दोन-तीन दिवसापासून लोणावळा शहरामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेत पर्यटन स्थळांवर व डोंगर भागामध्ये पर्यटक फिरताना दिसत आहेत. सहारा पुन्हा समोरील धबधबे, भूशी धरण, टायगर पॉईंट, शिवलिंग पॉईंट, खंडाळा राजमाची पॉईंट, ड्युक्स नोज पॉइंट, मिसिंग लिंक पॉईंट, तुंगार्ली धरण, भाजे लेणी व धबधबा, कार्ला लेणी हा सर्व परिसर पर्यटकांनी गजबजला आहे. पर्यटकांच्या या गर्दीमुळे लोणावळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांना या वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पर्यटकांना देखील पर्यटन स्थळापर्यंत पोहोचताना काही तास वाहतूक करण्याचा सामना करावा लागतो आहे.
लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी व पर्यटन स्थळांवर सुरक्षिततेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस तसेच लोणावळा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी हे देखील वाहतूक नियंत्रण व पर्यटन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात आहेत. मात्र पर्यटकांची व पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे वाहतूक नियोजन कोलमंडले आहे. पर्यटन स्थळांवर कोणताही अनुचित प्रकार अथवा कोणताही अपघात घडू नये याकरिता पोलीस तैनात आहेत. काही पोलीस मित्र देखील पोलिसांना या कामी मदत करत आहेत.



















