Blood Donation Camp l लोणावळा कॉलेज येथे रोटरी क्लब तर्फे रक्तदान व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न
लोणावळा : रोटरी क्लब ऑफ लोणावळा (डिस्ट्रिक्ट ३१३१, झोन २) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ३ ऑगस्ट रोजी लोणावळा कॉलेज येथे रक्तदान आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर (DG) नितीन ढमाले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रोटरी गव्हर्नर नितीन ढमाले यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, सामाजिक दायित्व जपत लोणावळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि परिसरासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून भविष्यातही असेच अनेक नवनवीन व उपयुक्त उपक्रम राबवले जातील.
यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो. ॲड. मोनाली कुलकर्णी-शेलार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारे विविध प्रकल्प क्लबतर्फे कॉलेजमध्ये नियमितपणे आयोजित केले जातील. तसेच लोणावळा कॉलेजचे प्राचार्य नरेंद्र देशमुख यांनी या सर्व सामाजिक उपक्रमांना कॉलेज प्रशासनाकडून सदैव पूर्ण सहकार्य लाभेल असे आश्वासन दिले.
या शिबिरात रक्तदान करण्यासोबतच उपस्थितांची व विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी देखील करण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाला उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी वरिष्ठ रोटेरियन श्रीकृष्ण वर्तक, धीरूभाई कल्याणजी, कौस्तुभ दामले, आय.पी.पी. विजया कल्याण, पी.पी. नारायण शरवाले, नितीन कल्याण, पुंडलिक वानखेडे, रवींद्र कुलकर्णी, आशिष मेहता आणि तसनीम भोरी यांच्यासह रोटरी क्लबचे अनेक सदस्य, कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार रो. रवींद्र कुलकर्णी यांनी मानले.



















