Breaking news

Lonavala Traffic l शनिवार रविवारची सुट्टी व भांगरवाडी रेल्वे गेटवरील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; वाहनांच्या लांबच लांब रांगा

लोणावळा : शनिवार रविवारची सुट्टी व लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी हे एक न सुटणारे कोडे आहे. 15 ऑगस्ट च्या वीकेंड नंतर लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी व पर्यटक संख्या यामध्ये घट होते असे काही जाणकार सांगतात. मात्र आजच्या शनिवार रविवारी झालेली वाहतूक कोंडी पाहून शनिवार रविवारची सुट्टी व वाहतूक कोंडी हे चित्र कायमच पाहायला मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पर्यटक हे गुगल मॅप चा वापर करत वेगवेगळ्या रस्त्याने लोणावळा शहरामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नांगरगाव ते भांगरवाडी रेल्वे गेटच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत आहेत. पर्यटकांच्या या वाहनांमुळे दोन्ही बाजूला काही मीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा जात असल्यामुळे या भागातून प्रवास करणारे स्थानिक नागरिक, शाळेचे विद्यार्थी, सायकली घेऊन जाणारी लहान मुले, वयस्कर नागरिक, महिला या सर्वांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.

       लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शनिवार रविवार प्रमाणेच आठवड्याचे सातही दिवस वाहनांच्या रांगा लागत असतात. आता शहरातील अंतर्गत रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी सातत्याने होऊ लागली आहे. मावळा पुतळा चौक ते रायवूड याबाबत सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वलवण गावात मॅप्रो गार्डनमुळे वाहतूक कोंडी होत आहे तसेच मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत याच मॅप्रो गार्डन मुळे नव्याने वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. लोणावळा शहरात देखील असे अनेक नवीन स्पॉट तयार झाले आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. नवनवीन ठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना पोलीस प्रशासनाचा व लोणावळा नगरपरिषदेचा यावर कोणताही अंकुश राहिलेला नाही. व्यावसायिक देखील व्यवसाय करत असताना पर्यटक वाहनांना वाहने उभी करण्यासाठी कुठेही जागा योग्य प्रकारे उपलब्ध करून देत नाहीत. केवळ आर्थिक नफा कमवणे हाच या व्यवसायिकांचा उद्देश असल्याचे दिसून येत आहे त्यावर महत्त्वाची कडे म्हणजे कोणीही यंत्रणा याची दखल घेत नाही व कारवाई सुद्धा करत नाही या सर्व गोष्टींचा नाहक त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागतो आहे.

      लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी 2019 या वर्षामध्ये नांगरगाव ते भांगरवाडी दरम्यान रेल्वे उड्डाणपूल कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र कामाचे कोणतेही नियोजन न करता सुरू केलेले हे काम सात वर्षानंतरही अपूर्णच आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या या बेजबाबदारपणाचा फटका नागरिकांना बसत आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण मागील अनेक वर्षापासून रखडले आहे. लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या ही सर्वश्रुत असते तरी ती सोडवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. रस्ता रुंदी करण्याचे कोणतेही प्रस्ताव व अंमलबजावणी होताना दिसत नाही तसेच शहरांमध्ये येणाऱ्या पर्यटकांची वाहने उभी करण्यासाठी कोठेही वाहन तळ्याची सुविधा आजपर्यंत लोणावळा नगर परिषदेने उपलब्ध केलेली नाही. नगरपरिषदेच्या या धोरण शून्य व अपयशी कारभाराचा फटका आज शहरातील प्रत्येक नागरिकांना बसत आहे.

इतर बातम्या