लोणावळ्याचा सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि कोणत्याही तक्रारी विना करण्याचा पोलिसांचा निर्धार; डीजे, लेझरला स्पष्ट मनाई
लोणावळा : सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि कोणत्याही तक्रारीविना पार पडावा, यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी काळे, लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी तसेच विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत गणेशोत्सवातील मिरवणूक, वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, मंडप परवानगी, विसर्जन, लेझर लाईट, डीजे, गुलालाचा वापर तसेच सामाजिक उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी यावेळी सांगितले की, यावर्षी आणि पुढे कायमस्वरूपी कोणत्याही तक्रारीविना गणेशोत्सव साजरा करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व गणेश मंडळे आणि प्रशासनाने परस्पर सहकार्याने काम करावे. लोणावळ्यात नंबरप्रमाणे गणेशोत्सव मिरवणूक काढण्याची परंपरा ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. वाहतूक कोंडीचा विचार करून मंडप उभारणीसाठी खूप आधीपासून परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेश मंडळांनी सामाजिक समस्यांचा विचार करून उत्सवाचे आयोजन करावे आणि नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझरला मनाई
विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच लेझर लाईटचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, त्यामुळे कोणत्याही मंडळाने लेझर लाईटचा वापर करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
विसर्जनाच्या सहाव्या दिवशी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. बॅरिकेटिंग करून वाहतुकीला शिस्त लावण्यात येईल. तसेच अनंत चतुर्थीच्या दिवशी मुख्य विसर्जन मिरवणूक सोहळ्यात प्रत्येक चौकात संबंधित गणेश मंडळ किती वाजता पोहोचेल, याचे वेळापत्रक निश्चित केले जाणार असून सर्व मंडळांना ते वेळापत्रक पाळावे लागेल.
गणेशोत्सव मनोभावे आणि समाजाच्या हितासाठी साजरा करावा, गुलालाचा वापर टाळावा, असेही त्यांनी आवाहन केले. दंगलसदृश परिस्थिती किंवा विटंबनेचे प्रकार घडू नयेत यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही सतर्क राहावे, असे त्यांनी सांगितले.
समाजोपयोगी गणेशोत्सवासाठी नगरपरिषदेचे बक्षीस
नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी आपणही गणेश मंडळाचा कार्यकर्ता असल्याचे सांगत मंडळांनी काही पथ्य पाळून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. गुलालाचा वापर कमी करावा, लेझर लाईटचा वापर करू नये आणि डीजेचा वापरही कमी करावा, असे त्यांनी सांगितले.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा सोनवणे यांनी केली.
गणेश मंडळांसाठी वीज वितरण कंपनीकडून विशेष व्यवस्था
वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी काळे यांनी गणेशोत्सव आनंदात पार पडावा आणि वीजपुरवठ्यामुळे कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक काळजी घेतली जाईल, असे सांगितले. गणेश मंडळांच्या कामासाठी एक कर्मचारी पूर्णवेळ नियुक्त करण्यात येणार असून रस्त्यावरील लोंबकळणाऱ्या वीजतारा ओढून घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मानाच्या पहिल्या गणपतीची मिरवणूक दुपारी ३ वाजता
गणेश मंडळांच्या सूचनांचा विचार करून पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद काम करत असल्याचे माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर यांनी सांगितले. लोणावळ्याची वेळेची परंपरा कायम ठेवत यंदाही मंडळ मिरवणूक वेळेत काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोणावळ्याचा मानाचा पहिला गणपती यंदा १०० वर्षे पूर्ण करीत असून, मिरवणूक भव्य-दिव्य असेल; मात्र ती कायद्याच्या चौकटीत आणि निर्धारित वेळेत काढली जाईल, असे बडेकर यांनी सांगितले. मिरवणुकीमध्ये बिभित्सपणा होणार नाही याची काळजी घेतली जाईल. दुपारी ३ वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार असून, यासाठी सर्व गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंडळांकडून विविध सूचना
बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही विविध समस्या आणि सूचना प्रशासनासमोर मांडल्या. राजू बोराटी यांनी इंद्रायणी नदी स्वच्छ करून पूर्वीचा घाट पुन्हा गणेश विसर्जनासाठी सुरू करण्याची मागणी केली. तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील वाहने आधीच बाजूला करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. ओंकार तरुण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीला उशीर होत असल्याने अनेक मंडळांना रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीत थांबावे लागत असल्याचे सांगितले. मावळा पुतळा चौकात पोहोचेपर्यंत रात्रीचे अकरा वाजत असल्याने पुढे वाद्य बंद करून मिरवणूक पुढे नेली जाते. त्यामुळे यंदा रांगेत उभे न राहता दुपारीच मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
तुफान मित्र मंडळानेही मिरवणुकीत मंडळांकडून वेळ पाळली जात नसल्यामुळे विसर्जनाला उशीर होत असल्याचे निदर्शनास आणले. पूर्वी मिरवणुकीत ढोलपथकांना प्राधान्य होते; मात्र आता विविध खेळ आणि कार्यक्रमांमुळे मिरवणुकीचा वेग कमी होत असल्याचे मंडळाने सांगितले. रोहिदास तरुण मंडळाने मान्सून लेक परिसरात अनेक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याचे सांगून त्या दिवशी त्या परिसरात पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी केली. विसर्जन मिरवणूक अधिक नियोजनबद्ध आणि वेळेत पार पडण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी मागणी प्रशांत पुराणिक यांनी केली.
एकूणच, यंदाचा गणेशोत्सव शिस्त, सुरक्षितता, सामाजिक बांधिलकी आणि वेळेचे नियोजन या चार मुद्द्यांवर केंद्रित करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. पोलीस प्रशासन, नगरपरिषद, वीज वितरण विभाग आणि गणेश मंडळांनी समन्वयाने काम केल्यास उत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी, गैरप्रकार आणि प्रशासनावरील ताण कमी करण्यास मदत होणार आहे.

















