Breaking news

डेक्कन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास विस्कळीत, प्रवाशांचे हाल

लोणावळा : मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या प्रसिद्ध डेक्कन एक्सप्रेस गाडीच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना आज सकाळी घडली. या बिघाडामुळे शेलू ते नेरळ दरम्यान एक्सप्रेस गाडी मार्गातच बंद पडली, ज्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल पाऊण तास विस्कळीत झाली होती.

      मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस नेहमीप्रमाणे पुण्याच्या दिशेने येत होती. गाडी शेलू ते नेरळ स्थानकांच्या दरम्यान आली असताना अचानक तिच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. इंजिन निकामी झाल्यामुळे एक्सप्रेस रेल्वे मार्गावरच जागीच उभी राहिली. मुख्य मार्गावरच गाडी बंद पडल्याने मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला.

लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांना फटका

या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. साधारण पाऊण तास (४५ मिनिटे) डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. याचा थेट फटका कर्जत-खोपोली दरम्यान धावणाऱ्या लोकल सेवांना बसला. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या इतर काही लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांनाही विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्याने त्या उशिराने धावत होत्या. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

पाऊण तासानंतर वाहतूक पूर्ववत

घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर प्रयत्न करून पाऊण तासानंतर इंजिनमधील हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात यश आले. त्यानंतर सदर डेक्कन एक्सप्रेस सुरक्षितपणे कर्जत रेल्वे स्थानकात आणण्यात आली व तिथून ती पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. एक्सप्रेस पुढे रवाना झाल्यानंतर या मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

इतर बातम्या