Breaking news

मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी खालापूर वन विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल; निसर्गप्रेमींच्या मदतीने अत्याधुनिक पिंजरा दाखल

खालापूर : तालुक्यात वाढता वन्यजीवांचा वावर, अपघातांची शक्यता आणि जखमी प्राण्यांवर वेळेत उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा लक्षात घेऊन, खालापूर वन विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वन्यजीव आणि मानव यांच्यातील संभाव्य संघर्ष कमी करण्यासाठी 'हेल्प फाउंडेशन' आणि 'आहिल फेन्सिंग अँड गॅबियन' कंपनीच्या सहकार्याने वन विभागाला एक अत्याधुनिक सापळा (पिंजरा) उपलब्ध झाला आहे.

      खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार हे वनसंपदा अबाधित राखण्यासाठी आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या पुढाकाराने आणि स्थानिक संस्था तसेच निसर्गप्रेमींसोबत समन्वय साधून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचाच हा एक भाग आहे. गुरुवारी, दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात हा पिंजरा अधिकृतपणे वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला.

      या उपक्रमात 'हेल्प फाउंडेशन'चे सदस्य आणि 'आहिल फेन्सिंग अँड गॅबियन'चे प्रमुख अश्फाक लोगडे यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी स्वतः या पिंजऱ्याचे डिझाईन तयार केले असून, तो वन विभागाला पूर्णपणे निशुल्क स्वरूपात सुपूर्द केला आहे. विशेष म्हणजे, यापुढेही वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात अशा प्रकारचे सापळे तयार करण्यासाठी आपण नेहमी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

लोकसहभागातूनच वन्यजीव संरक्षण शक्य - राजेंद्र पवार

या उपक्रमाचे कौतुक करताना वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले की, "केवळ शासकीय पातळीवर प्रयत्न करून चालणार नाही, तर लोकसहभागातूनच वन, वनसंपदा आणि वन्यजीवांचे खऱ्या अर्थाने संरक्षण करणे शक्य आहे." या संपूर्ण प्रक्रियेत वनपाल भगवान दळवी यांनी विशेष भूमिका बजावली.

       या छोटेखानी कार्यक्रमाला वन विभागाचे वनरक्षक घुटे, चंदन नागरगोजे, गायकवाड, काटकर, सागर टोकरे कोळी, मयूर निकम, धनाजी सावंत तसेच वनपाल नितीन कांबळे हे उपस्थित होते. त्यांच्यासोबतच खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर पानसरे, 'हेल्प फाउंडेशन'चे गुरुनाथ साठेलकर, हनीफ कर्जीकर, अमोल कदम, अमोल ठकेकर, प्रवीण शेंद्रे, आकाश सताने, सरफराज पटेल, दिनेश पाटील यांच्यासह परिसरातील अनेक प्राणीमित्र आणि निसर्गप्रेमी आवर्जून उपस्थित होते.

इतर बातम्या