सुरजागड लॉयड्स मेटल्स प्रकल्पामुळे परिसराला प्रदूषणाचा विळखा; शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी यांची तात्काळ कारवाईची मागणी
लोणावळा : शिवसेना तर्फे गडचिरोली जिल्ह्यातील पर्यावरण प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. लॉयड्स मेटल्स सुरजागड प्रकल्पामुळे परिसरातील पाणी व पर्यावरण मोठ्या प्रमाणावर दूषित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अलीकडे समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये पाण्याचा रंग लालसर झालेला दिसत असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित परिसरातील जलस्रोत प्रदूषित झाल्याने शेती, जनावरांचे आरोग्य तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली देवेंद्रजी फडणवीस, पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देऊन गडचिरोली जिल्ह्यातील पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर परिस्थिती गंभीर असतानाही पर्यावरण विभागाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश गोपाळ केदारी यांनी सांगितले की, या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा स्थानिक नागरिकांच्या हितासाठी शिवसेना आक्रमक आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच, पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने संबंधित प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.





















