Breaking news

Karla News l कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडून पाहणी

लोणावळा : पुणे जिल्हा परिषदेच्या हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी आरोग्य सेवा, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

       भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व विभागांची पाहणी करण्यात आली. परिसरातील आरोग्यविषयक परिस्थिती, उपलब्ध सुविधा आणि आरोग्य सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. तसेच केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य उपक्रमांचा आढावाही घेण्यात आला.

       यावेळी अति जोखमीच्या गरोदर मातांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आली. त्यांच्या आरोग्याची स्थिती, आवश्यक वैद्यकीय सेवा आणि नियमित तपासण्यांबाबत माहिती घेऊन संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर पुणे जिल्हा आरोग्य व बांधकाम विभागाच्या सभापती दिपाली हुलावळे यांची भेट घेऊन तालुक्यातील कीटकजन्य आजारांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः डेंग्यू, चिकनगुनिया आणि हिवताप या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती आणि आरोग्य विभागाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

       याचदरम्यान श्री एकविरा विद्या मंदिर, कार्ला येथेही भेट देण्यात आली. शाळेतील शालेय आरोग्य तपासणी पथकांच्या कामकाजाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसंदर्भातील व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने डेंग्यू, चिकनगुनिया आणि हिवतापासारख्या आजारांच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला झालेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

इतर बातम्या

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने दरडग्रस्तांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला मंत्री महाजनांच्या तातडीच्या सूचना