आनंदवार्ता l वराळेच्या श्लोक तुळजापुरेची नासा दौऱ्यासाठी निवड; जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
कार्ला (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा परिषद आयोजित इस्रो-नासा निवड चाचणीमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वराळे येथील विद्यार्थी कु श्लोक भीमराव तुळजापुरे याची नासा (NASA) दौऱ्यासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याने मिळविलेल्या या यशामुळे वराळे गावासह संपूर्ण मावळ तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्लोकच्या या यशामागे त्याची जिद्द, मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाबरोबरच मिळालेले योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
या विद्यार्थ्यांला त्याचे शिक्षक संतोष भारती, संतोष कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे, विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज, केंद्रप्रमुख केंद्र इंदोरी भगवंता बनकर व सोनाली सोनकटाळे, मुख्याध्यापिका पंकजा गुंडा यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापिका पंकजा गुंडा, शिक्षक अशोक बारवे, सुनंदा जाधव, आराधना जोशी, गंगाराम शेळके, नीलिमा कदम, रमेश गायकवाड, सुरेखा पडवळ, सुरेखा बारवकर, दुर्गा ठाकरे ,अमृता साळुंके यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी श्लोकचे अभिनंदन केले. माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनीही श्लोक याचे विशेष अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही जागतिक स्तरावर यश मिळविण्याची क्षमता आहे, हे श्लोकच्या यशाने अधोरेखित केले असून त्याची नासापर्यंतची ही भरारी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. वराळेच्या मातीतून नासाच्या आकाशापर्यंतची ही भरारी म्हणजे संपूर्ण शाळा परिवारासाठी अभिमानाचा क्षण असून श्लोकच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी ओळख मिळाली आहे, अशी भावना श्री. संतोष भारती यांनी यावेळी व्यक्त केली.



















