तुंगार्लीतील गुरुकुल हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा; ८५ विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक मूर्ती
लोणावळा : तुंगार्ली येथील विद्या विनय सभा गुरुकुल हायस्कूलच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या प्रशस्त सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते दहावीतील तब्बल ८५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध आकारांच्या सुबक व आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.
कलाशिक्षक श्री. रमेश बोंद्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम गेल्या २२ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनेश राणावत तसेच विश्वस्त व माजी मुख्याध्यापक श्री. बापूलाल तारे यांच्या प्रेरणेने हा पर्यावरणपूरक उपक्रम पुढे नेला जात आहे. कार्यशाळेत कलाशिक्षक रमेश बोंद्रे यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मातीचा योग्य वापर, मूर्तीचा आकार, बांधणी, सुबकता तसेच मूर्तीला आकर्षक स्वरूप देण्याच्या विविध पद्धती त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांनीही आपल्या कल्पकतेचा वापर करत अत्यंत सुंदर आणि देखण्या गणेशमूर्ती तयार केल्या.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या सृजनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने संस्थेच्या वतीने स्पर्धेतील प्रथम सात क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या गणेशमूर्ती बनविण्याच्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कला शिक्षक व शिल्पकार श्री. विशाल केदारी तसेच लोणावळ्यातील प्रसिद्ध गणेशमूर्ती कारखानदार व शिल्पकार श्री. नकुल होजगे यांनी काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना मातीकामातील विविध बारकावे, मूर्ती घडविण्याच्या तंत्राबरोबरच रंगकाम करताना घ्यावयाची काळजी आणि रंगसंगती याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बयाजी खुरंगे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक श्री. सूचित सूर्यवंशी यांनी करून दिला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. दीपक मावकर व श्री. भूषण शिरुडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीनल पानसरे यांनी केले, तर श्री. दिनेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या कलात्मक सुप्तगुणांना चालना देणे, मुक्ताविष्काराला आणि सृजनात्मकतेला वाव देणे तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे, या तिन्ही बाबींचा सुंदर मिलाफ या कार्यशाळेत पाहायला मिळाला. २२ वर्षांपासून सुरू असलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे पालक, शिक्षक व उपस्थितांनी कौतुक केले.


















