Breaking news

मावळातील ४५ दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांग गरजू लाभार्थ्यांना आधार देण्यासाठी एस. आर. ट्रस्ट, रतलाम (मध्यप्रदेश) आणि ALIMCO, रतलाम (मध्यप्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम अवयव वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) भाऊसाहेब देसाई जनरल हॉस्पिटल येथील मेमोरियल ऑडिटोरियम हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात सुमारे ४५ लाभार्थ्यांना ऑन-द-स्पॉट कृत्रिम पाय व कॅलिपरचे मोफत वितरण करण्यात आले.

       कार्यक्रमास मावळ तालुक्याचे गटविकास अधिकारी सेवक थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेश गौरी, ALIMCO मुंबईचे डॉ. किरण पावरे, एस. आर. ट्रस्टचे शाहरुख शहा, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या महिला अध्यक्षा ज्योती राजीवडे, वडगाव नगरीचे नगरसेवक अजय भवार, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष सुभाष शेडगे, सामाजिक कार्यकर्ते भरत नाना राजीवडे, सोमनाथ पटेकर, सोमनाथ मोरे, अंगणवाडी सुपरवायझर जुलै खा शेख, मेडिकल सोशल वर्कर आश्विनी वनारसे, रेखा बरीदे, छाया साळुंखे, सुरैया शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

      उपस्थित मान्यवरांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. यावेळी एस. आर. ट्रस्टचे शाहरुख शहा यांनी लाभार्थ्यांना कृत्रिम हात-पायांचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा, तसेच कॅलिपर वापरताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. कृत्रिम अवयवांचा योग्य वापर केल्यास दैनंदिन जीवनातील हालचाली अधिक सुलभ होण्यास मदत होते, अशी माहिती त्यांनी दिली.

मावळचे गटविकास अधिकारी सेवक थोरात यांनी दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना व सुविधा उपलब्ध असल्याचे सांगून, पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले. दिव्यांग नागरिकांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

या उपक्रमांतर्गत मावळ तालुक्यातील जवळपास ४५ दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम पाय व कॅलिपरचे ऑन-द-स्पॉट वितरण करण्यात आले. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. कार्यक्रमास साजन येवले, संदीप लोखरे, संपत लांडगे, गणेश शेडगे यांच्यासह नायगाव येथील एस.ई.सी. सेंटरच्या शाळेतील सुमारे २५ विद्यार्थी तसेच मावळ तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते भरत नाना राजीवडे यांच्या वतीने उपस्थित शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. दिव्यांग गरजू नागरिकांना मोफत कृत्रिम अवयव उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला.

इतर बातम्या