मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंचासह सहा सदस्य अपात्र
लोणावळा : भाजे ग्रामपंचायतीतील विद्यमान सरपंच, उपसरपंच व चार ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्याचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे यांनी दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १४ (1) (ह) अन्वये दाखल करण्यात आलेल्या विवाद अर्जाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला आहे. भाजे गावातील प्रताप कैलास गरवड व शेखर चंद्रकांत दळवी यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व चार ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. संबंधित पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कराची थकबाकी मुदतीत भरली नसल्याचा आरोप करत त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली होती.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरण जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे पाठविले. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून हे प्रकरण पंचायत समिती वडगाव मावळ यांच्याकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आले. पंचायत समिती वडगाव मावळ यांच्याकडून करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित विद्यमान सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मुदतीमध्ये कराची थकबाकी केलेली नसल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. त्यानुसार चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला. या अहवालाच्या आधारे तसेच अर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पुणे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज फेटाळून लावला होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाविरुद्ध प्रताप कैलास गरवड व शेखर चंद्रकांत दळवी यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे अपील दाखल केले. या अपीलावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यानंतर २ सप्टेंबर २०२६ रोजी अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी आदेश पारित केला. या आदेशानुसार भाजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रिया अमित ओव्हाळ, उपसरपंच कोमल किरण केदारी, सदस्य विकास बबन वाल्हेकर, प्रमोद विजय ढगे, सारिका विश्वनाथ पदमुले, कविता अशोक चौरे यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.
या प्रकरणात अपीलार्थी प्रताप कैलास गरवड व शेखर चंद्रकांत दळवी यांच्या वतीने ॲड. अमित आव्हाड, ॲड. सोपान मुंडे, ॲड. गौरव पाचपोळ, ॲड. जय राठोड आणि ॲड. वेदांत कारंजकर यांनी कामकाज पाहिले.



















