सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
लोणावळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कुसगाव-लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात साजरा करण्यात आला. कॅम्पसच्या फुटबॉल ग्राउंड / स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कुसगाव-लोणावळा येथे योगाचे महत्त्व, निरोगी जीवनशैलीची गरज आणि मानसिक-शारीरिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, कॅम्पस संचालक डॉ. शिवाजी देसाई, तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमासाठी योगतज्ज्ञ कु. संस्कृती डहाळे यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणेची प्रात्यक्षिके सादर करून त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री यांनी विद्यार्थ्यांना योगाचा दैनंदिन जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन केले. कॅम्पस संचालक डॉ. शिवाजी देसाई यांनी योग ही भारतीय संस्कृतीची जगाला लाभलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगत निरोगी समाजनिर्मितीसाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. गणेश खांडेकर यांनी नियमित योगाभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते, असे प्रतिपादन केले. तर प्रा. संतोष दबडे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत योगामुळे व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले.
या उपक्रमात प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. गणेश खांडेकर, सौ आर डी मंत्री मॅडम, श्री संजय बनसोडे, श्री मिश्रा सर, श्री मासाळ , NSS स्वयंसेवक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध योगासने, प्राणायाम व ध्यानसाधना केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, योगतज्ज्ञ आणि सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले.
"*एक पृथ्वी, एक आरोग्य*" हा यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात या उपक्रमाला यश मिळाले. योगाचे महत्त्व अधोरेखित करत निरोगी व संतुलित जीवनशैलीचा संदेश देणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.






















