खंडाळा घाटातील गारमाळ परिसरात बिबट्याचा वावर; वन विभागाकडून सतर्कतेचा इशारा आणि संयुक्त गस्तीला सुरुवात
खोपोली (प्रतिनिधी) : खंडाळा घाटातील गारमाळ परिसरात नुकतेच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी गारमाळ रस्त्यावर बिबट्या दिसल्याच्या घटनेमुळे या भागात वन्यजीवांची उपस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर खालापूर तालुका वन विभागाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून खालापूर तालुका वनाधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भगवान दळवी, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, वनकर्मचारी घुटे, नागरगोजे, काटकर आणि स्थानिक प्राणीमित्रांच्या पथकाने गारमाळ परिसरातील जंगल आणि दरी भागात सविस्तर सर्वेक्षण केले. या मोहिमेदरम्यान केवळ पाहणीच केली नाही, तर वन्य प्राण्यांसाठी जंगलात उपलब्ध असलेले नैसर्गिक पाणवठे शोधून त्यातील गाळ काढून ते स्वच्छ करण्याचे महत्त्वपूर्ण कामही करण्यात आले. या संयुक्त पाहणीदरम्यान वन विभागाच्या पथकाला परिसरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याची विष्ठा आढळून आली आहे. याव्यतिरिक्त साळींदर आणि इतर काही वन्य प्राण्यांच्या पायांचे ठसेही निदर्शनास आले आहेत. या पुराव्यांमुळे गारमाळ परिसरात बिबट्या आणि अन्य प्राण्यांचा सक्रिय वावर असल्याची पुष्टी झाली आहे.
वन विभागाच्या कार्याला स्थानिक पातळीवरून मोठे बळ मिळत आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी अहिल फेन्स अँड गॅबियनचे संचालक अशपाक लोगडे यांच्यासह हेल्प फाउंडेशनचे सदस्य अमोल कदम, अमोल ठकेकर, दिनेश ओसवाल, निलेश कुदळे, महेश भोसले, भक्ती साठेलकर आणि शंतनु खरे यांनी वन कर्मचाऱ्यांसोबत परिसरात संयुक्त गस्त घालण्याची तयारी दर्शवली आहे. सामाजिक संस्थांच्या या सक्रिय सहभागामुळे सुरक्षेच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहेत.
सुरक्षेचा उपाय म्हणून वन विभागाच्या वतीने परिसरात "बिबट्याचा वावर आहे, काळजी घ्या" अशा आशयाचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत घराबाहेर पडताना अधिक सावधगिरी बाळगावी, जंगल किंवा निर्मनुष्य भागात एकट्याने जाणे टाळावे, लहान मुलांना घराबाहेर एकटे पाठवू नये, परिसरात बिबट्या किंवा कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास घाबरून न जाता त्वरित वन विभाग किंवा स्थानिक प्रशासनाला त्याची माहिती द्यावी.
वन विभागाच्या उपाययोजना आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य यामुळे संभाव्य धोका टाळण्यास मोठी मदत होणार असून, आता नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करणे आवश्यक आहे.





















