Breaking news

Lonavala Political News l लोणावळा नगरपरिषद निवडणुकीमध्ये यंदा महायुती व महाआघाडी यांच्यात रंगणार निवडणुकीचा महासंग्राम

लोणावळा : पुढील चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मागील साडेतीन वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग खुला होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. मागील निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणुका झाल्या होत्या. मागील पंचवार्षिक काळामध्ये राज्यात व केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात सत्तांतरे झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नव्याने निर्माण झालेली महायुती व महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील लढवल्या जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यामधील महत्त्वाची नगरपरिषद अशी ओळख असलेल्या लोणावळा नगर परिषदेची निवडणूक देखील महायुती व महाविकास आघाडी अशीच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोणावळा शहराचे राजकारण हे इतर ठिकाणच्या राजकारणापेक्षा वेगळे असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर यामध्ये कोणती उलथापालत होईल हे देखील अनाकलनीय आहे. तूर्तास मात्र निवडणुका होण्याची चिन्हे दिसू लागल्याने मागील अडीच तीन वर्षापासून थंडावलेले इच्छुक पुन्हा मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सक्रिय होऊ लागले आहेत. 

      जानेवारी 2022 साली लोणावळा नगरपरिषदेची मुदत संपली. तेव्हापासून लोणावळा नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. सुरुवातीच्या काळात निवडणुका वेळेत लागतील अशी शक्यता असल्याने मुदत संपण्याच्या किमान वर्षभर अगोदर पासून अनेक इच्छुकांनी 2022 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. काही माजी लोकप्रतिनिधी व काही नवीन इच्छुक यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांची देवदर्शन, त्यांचे धार्मिक कार्यक्रम, त्यांचे वैयक्तिक कार्यक्रम आणि अडचणी यासाठी मदत करण्यावर भर दिला होता. नंतरच्या काळात मात्र निवडणुका लांबल्याने हे सर्व इच्छुक थंडावले होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी मतदारांशी संपर्क साधणाऱ्या इच्छुकांनी नंतरच्या काळामध्ये हात आखडता घेत नॉट रिचेवर होणेच पसंत केले होते. आता पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता बळवली असल्याने हे इच्छुक पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये लोणावळ्यात राजकीय वातावरण गरम होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. 

      मागील वर्षांमध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये मावळ तालुक्यात फार अलबेल असे चित्र नव्हते. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांना पराभूत करण्यासाठी मावळ तालुक्यातील सर्व पक्ष एकत्र आले होते त्यामध्ये महायुतीमधील देखील सर्व घटक पक्षांचा समावेश होता. असे असताना देखील आमदार सुनील शेळके यांनी मोठ्या फरकाने विजयी संपादित केला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये आलेल्या कटू अनुभवानंतर आमदार सुनील शेळके हे महायुती सोबत ही निवडणूक लढवणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वेगळी आघाडी करणार की स्वबळावर लढणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आमदार सुनील शेळके हे मागील पंचवार्षिक काळात विजयी झाल्यापासून त्यांनी लोणावळा शहरावर आपली पकड कायम ठेवली आहे. लोणावळा शहरासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी देखील उपलब्ध करून दिला आहे अनेक वर्षाची येथील नागरिकांची मागणी असलेले उपजिल्हा रुग्णालयाचे काम देखील त्यांच्याच पाठपुराव्यानंतर सध्या अंतिम टप्पे मध्ये आहे. लोणावळा आजूबाजूच्या परिसराच्या पर्यटन विकासासाठी त्यांच्याच माध्यमातून जागतिक कीर्तीचा स्काय वॉक हा प्रकल्प लोण्यात आला आहे. 

     महायुती मधील अनेक नेते मंडळींनी आमदार सुनील शेळके यांना विरोध दर्शवला असला तरी लोणावळा शहर भाजपाचे अध्यक्ष व गटनेते हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आमदार सुनील शेळके यांच्यासोबत या निवडणुकीत ठामपणे उभे राहिले होते. त्याची परतफेड करण्याची वेळ लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून आमदार सुनील शेळके यांच्यावर आलेली आहे. तर आमदार सुनील शेळके यांना रोखण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मावळामध्ये एक वेगळी आघाडी निर्माण होणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीतच निवडणूक ही लोणावळा नगर परिषदेची असली तरी ती आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याच अवतीभवती फिरणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लोणावळा नगर परिषदेची यंदाची सार्वत्रिक निवडणुकी मागील काही निवडणुकांपेक्षा वेगळी असणार आहे. मागील काही वर्ष लोणावळा नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता आहे. मागील पंचवार्षिक काळामध्ये जनतेमधून भाजपाचाच नगराध्यक्ष विजयी झाला होता. त्यामुळे लोणावळा नगरपरिषदेवरील ही सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाला देखील मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत त्यामुळे ही निवडणूक महायुती व महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली जाणार की स्वबळावर लढली जाणार हे प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे सध्यातरी राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे.

इतर बातम्या