Lonavala News l लोणावळ्यात ‘रान मेव्याचा’ बहार – डोंगरकाठच्या नैसर्गिक संपत्तीला शहरी प्रतिसाद

लोणावळा : पर्यटन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात सध्या रानमेव्याचा सणच सुरू आहे. आजूबाजूच्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली करवंदे, जांभूळ, आंबे, फणस, तोरणे यासारखी फळे भरपूर प्रमाणात आली असून, त्याचा लाभ शहरी नागरिकांना मिळतो आहे.
या भागात वास्तव्यास असलेले कातकरी व ठाकर समाजाचे लोक ही नैसर्गिक देणगी डोंगरातून गोळा करून थेट लोणावळ्यातील बाजारपेठांमध्ये व रस्त्यालगत विक्रीस आणत आहेत. त्यामुळे शहरवासीयांना निसर्गातील हा खजिना चाखण्याची एक अनोखी संधी प्राप्त झाली आहे.
रानमेवा केवळ चवीलाच अप्रतिम नसून तो पोषणमूल्यांनी परिपूर्ण आहे. करवंदे आणि जांभळात अँटीऑक्सिडंट्स व लोहाचे प्रमाण अधिक असून, फणसामध्ये भरपूर फायबर्स आणि अन्नपचनास मदत करणारी तत्त्वे असतात. हे फळे पारंपरिक आर्युवेदीक औषधांमध्ये वापरली जात असून, स्थानिक लोकांनी अनेक पिढ्यांपासून यांचा उपयोग केला आहे. यातून एकीकडे शहरी ग्राहकांचे आरोग्यसंपन्न अन्नाकडे वळण्याचे स्वागतार्ह चित्र दिसते आहे, तर दुसरीकडे आदिवासी समाजातील कुटुंबांना आर्थिक उत्पन्नाचा मोठा स्त्रोत मिळत आहे. वनौषधी व रानफळांचा सन्मान व वापर वाढल्यास जैवविविधतेचे रक्षण होण्यासही हातभार लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तसेच पर्यावरणप्रेमींनी रानमेव्याच्या या स्थानिक बाजारास अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कारण, ही केवळ खाण्याची नव्हे तर स्थानिक संस्कृती व जीवनशैलीशी जोडलेला अमूल्य ठेवा आहे.