Breaking news

SIHMCT येथे ‘ओणम संध्या २०२६’ उत्साहात साजरी

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (SIHMCT) येथे “ओणम संध्या २०२६” हा सांस्कृतिक व खाद्यविषयक कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. केरळची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि खाद्यसंस्कृती विद्यार्थ्यांना जवळून अनुभवता यावी, तसेच त्यांच्या आतिथ्य व कार्यक्रम व्यवस्थापन कौशल्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.

     कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सादर केलेली पारंपरिक केरळी सद्या हे होते. विद्यार्थ्यांनी केळीच्या पानावर २५ पेक्षा अधिक पारंपरिक केरळी पदार्थांची आकर्षक मांडणी करून पाहुण्यांना सेवा दिली. पदार्थांची तयारी, सादरीकरण, सेवा, स्वच्छता आणि पाहुण्यांशी संवाद या सर्व बाबींमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले.

     प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी सुंदर व रंगीबेरंगी पुक्कलम तयार करून कार्यक्रमस्थळी ओणमचा पारंपरिक उत्साह निर्माण केला. केरळच्या संस्कृतीवर आधारित सजावट आणि पारंपरिक वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. उपस्थित मान्यवरांचे टिळा आणि मोळी धाग्याने पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागतामधून भारतीय संस्कृतीतील “अतिथी देवो भवः” या मूल्याचा सुंदर प्रत्यय आला.

     या कार्यक्रमाला हॉटेल उद्योगातील मानव संसाधन व्यवस्थापक, अनुभवी शेफ तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व संचालक उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना आपली पाककला, खाद्य सादरीकरण, सेवा आणि आतिथ्य कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. मान्यवरांशी झालेल्या संवादातून व त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील अपेक्षा आणि व्यावसायिक कार्यपद्धती समजून घेण्यास मदत झाली.

     या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट टीमवर्कच्या माध्यमातून केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना कार्यक्रम व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, नेतृत्व, स्वच्छता, खाद्यसेवा आणि ग्राहकाभिमुख आतिथ्य यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. वर्गातील सैद्धांतिक शिक्षणाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त आणि अनुभवसमृद्ध ठरला.

    या कार्यक्रमास लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, SIT चे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, SKNSITS चे के. पी. पाटील, SIPS च्या प्राचार्या डॉ. रुकसाना पिंजारी, SIBACA च्या डायरेक्टर सौ. साधना आवटे, SIHMCT चे प्राचार्य पी. के. जावळे, SKNCOE चे प्राचार्य बी. ए. शिंगाडे तसेच कॅम्पस मधील विविध NSS चे अधिकारी, संस्थेचे विद्यार्थी हि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

     कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून प्रा. कल्पना जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व संचालन प्राचार्य श्री. प्रतीक जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, सर्जनशीलता, मेहनत आणि उत्कृष्ट टीमवर्क यामुळे “ओणम संध्या २०२६” हा कार्यक्रम आनंददायी, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध, व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त आणि सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

इतर बातम्या