भांगरवाडीत किरकोळ कारणावरून दुकान चालकाला शिविगाळ व हाताने मारहाण; वजन काटा देखील फेकून दिला
लोणावळा : भांगरवाडी येथे किरकोळ कारणावरून एका दुकान चालकाला शिवीगाळ करत हाताने मारहाण केल्याची तसेच दुकानातील वजन काटा फेकून दिल्याची घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी विकास ओमप्रकाश खंडेलवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरहान अब्दुल हमीद (राहणार लोणावळा) याच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा करण्यात आला आहे. विकास खंडेलवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची वडील ओम प्रकाश खंडेलवाल हे भांगरवाडी येथील त्यांच्या ओमप्रकाश ॲन्ड ट्रेडिंग दुकानांमध्ये असताना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अरहान हा दुकानांमध्ये बिस्कीटचा पुडा घेण्यासाठी आला. दहा रुपयांचा बिस्किट चा पुडा घेतल्यानंतर त्याने ऑनलाईन 210 रुपये खंडेलवाल यांना पाठवले. व त्यांच्याकडे दोनशे रुपये कॅश मागू लागला.
ओम प्रकाश खंडेलवाल यांनी त्यांचा मुलगा विकास झाला फोन करून दोनशे रुपये ऑनलाइन पाठवण्यास सांगितले. मात्र कॅश देत नसल्यामुळे चिडलेल्या अरहान याने ओम प्रकाश खंडेलवाल यांना शिवीगाळ करत धमकवण्यास सुरुवात केली तसेच हाताने त्यांना मारहाण करत दर्शनी भागामध्ये असलेला वजन काटा फेकून देऊन त्याचे नुकसान केले आहे. यावेळी आजूबाजूचे इतर लोक जमा झाल्यानंतर हे भांडण सोडवण्यात आले.
भांगरवाडी या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे तसेच संतापाचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी विकास खंडेलवाल यांनी केली आहे. लोणावळा खंडाळा व्यापारी असोसिएशन यांच्याकडे देखील त्यांनी या घटनेची माहिती दिली असून कारवाईची मागणी केली आहे.





















