Lonavala Crime News l लोणावळ्यात ड्रग्ज तस्कर गजाआड; रायवूड उद्यान परिसरात लोणावळा शहर पोलिसांची मोठी कारवाई!
लोणावळा : पर्यटननगरी लोणावळ्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. काल (दि. १५ मे) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रायवूड येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने आलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून घातक 'एमडी' (मेफेड्रॉन) ड्रग्ज आणि वाहनासह एकूण १ लाख २ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रेम सुनील खडके (वय २५ वर्षे, रा. वेहेरगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवादार मयूर काळूराम अबनावे (वय ३८) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. १५ मे रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास रायवूड येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ एक जण अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार होता. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात पाळत ठेवली. यावेळी संशयास्पद रित्या वावरत असलेल्या प्रेम खडके याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे एका प्लास्टिकच्या पिशवीत बेकायदेशीररित्या बाळगलेला 'एमडी' (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ मिळून आला.
पोलिसांनी आरोपीकडून एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज: १०,००० रुपये किमतीचे ३ ग्रॅम ५४ मिलीग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, २,३०० रुपये रोख, १०,००० रुपये किमतीचा एक विव्हो कंपनीचा मल्टीकलर मोबाईल, ८०,००० रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची स्कुटी असा एकूण १ लाख २ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
आरोपी प्रेम खडके याच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात NDPS ॲक्ट ८(c), २०(b) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज (दि. १६ मे) पहाटे ०४:३३ वाजता या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे करीत आहेत.





















